
घोरवडेश्वरात हरित क्रांतीची सुरुवात : देवस्थान ट्रस्टचा ११ हजार वृक्षारोपणाचा उपक्रम
शेलारवाडी : श्री क्षेत्र घोरवडेश्वर देवस्थान ट्रस्ट, मावळ यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व ओळखत ११,००० वृक्षारोपणाच्या महाअभियानाची प्रेरणादायी सुरुवात केली. सकाळच्या आल्हाददायक वातावरणात, घोरवडेश्वर पर्वतरांगांच्या पायथ्याशी भक्त, ग्रामस्थ आणि स्वयंसेवकांच्या उपस्थितीत हा उपक्रम उत्साहात राबवण्यात आला. विशेष म्हणजे, प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ आणि जेके फाऊंडेशनच्या प्रतिनिधींनी या उपक्रमाचा शुभारंभ करून सर्वांना पर्यावरण रक्षणाचा सामूहिक संदेश दिला.



देवस्थान परिसर अधिक हिरवागार व्हावा, भावी पिढ्यांना स्वच्छ व निरामय वातावरण मिळावे यासाठी देवस्थान ट्रस्टने ‘हरित संकल्प’ हाती घेतला आहे. वृक्षारोपण करताना जॅकी श्रॉफ यांनी “झाडे हीच आपली खऱ्या अर्थाने संपत्ती आहे. झाडे लावा आणि जगवा, दोन्ही जबाबदाऱ्या पूर्ण करा,” असे सांगत युवा वर्गाला मोठ्या सहभागासाठी प्रेरित केले. जेके फाऊंडेशननेही पुढील काळात मार्गदर्शन, देखभाल आणि तांत्रिक साहाय्य देण्याचे आश्वासन दिले.


या वेळी श्री क्षेत्र घोरवडेश्वर देवस्थान चे उपाध्यक्ष अभिजीत (टायगर) भेगडे यांनी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. “वृक्षारोपण करणे हा पहिला टप्पा आहे; खरी जबाबदारी त्यांना वाढवण्याची आहे. घोरवडेश्वर प्रतिष्ठाण पुढील काळात अशा पर्यावरणपूरक उपक्रमांना प्राधान्य देणार आहे,” असे ते म्हणाले.


ग्रामस्थ, भक्त, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, तसेच स्वयंसेवक या सर्वांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. परिसरात आत्तापर्यंत ३५०० हजार रोपे लावण्यात आली आहे पुढील काही महिन्यांत उर्वरित रोपे लावली जाणार असून घोरवडेश्वर डोंगररांगांचा नैसर्गिक नजारा आणखी खुलणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
हरित मावळाच्या दृष्टीने घेतलेले हे पाऊल पर्यावरण संवर्धनाला नवचैतन्य देणारे ठरेल, असा आशावाद सर्वत्र व्यक्त होत आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















