
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ‘गोल्डन रोटरी’चा मदतीचा हात
तळेगाव दाभाडे : सामाजिक बांधिलकी जपत रोटरी क्लब गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्या वतीने नवीन समर्थ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी व्हीलचेअर प्रदान करण्यात आली. गोल्डन रोटरीचे मेंबरशिप डायरेक्टर रो. प्रदीप मुंगसे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणप्रवासाला मोठा आधार मिळणार आहे.


या कार्यक्रमास संस्थेचे सचिव संतोष खांडगे, नंदकुमार शेलार, विनायक अभ्यंकर, महेशभाई शहा, यादवेंद्र खळदे, सोनबा गोपाळे गुरुजी, दामोदर शिंदे, प्रसाद पादिर, राकेश गरुड, पत्रकार रेखाताई भेगडे, प्रा. काळोखे ताई तसेच रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे अध्यक्ष श्रीशैल मेंथे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी गोल्डन रोटरीच्या सामाजिक कार्याचे मनापासून कौतुक केले. भविष्यातही अशाच भरीव आणि उपयुक्त सामाजिक उपक्रमांची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


याच शाळेत आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथालय उद्घाटन कार्यक्रमासाठी गोल्डन रोटरीचे अध्यक्ष संतोष परदेशी यांना विशेष आमंत्रण देण्यात आले होते. या कार्यक्रमास गोल्डन रोटरीचे प्रसाद पादिर, प्रदीप मुंगसे आणि राकेश गरुड उपस्थित होते. शैक्षणिक सुविधा वाढविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रोटरी क्लब सातत्याने प्रयत्नशील असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.


गोल्डन रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष परदेशी यांनी आपल्या मनोगतात समाजातील गरजू घटकांसाठी रोटरी क्लब सदैव तत्पर असल्याचे सांगितले. “दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात समान संधी मिळावी, हाच आमचा मुख्य उद्देश आहे, असे ते म्हणाले.

या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले असून, गोल्डन रोटरीचा हा मदतीचा हात समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















