पुण्यात ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारांचा दिमाखदार सोहळा; कर्तृत्वाचा गौरव, प्रेरणेचा उत्सव
पुणे, दि. 2 मे (प्रतिनिधी): महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्याच्या कर्तृत्ववान सुपुत्रांचा सन्मान करणारा ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र पुरस्कार 2026’ हा भव्य व प्रेरणादायी सोहळा शुक्रवारी, 2 मे रोजी येरवडा येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाला, समृद्ध संस्कृतीला आणि विविध क्षेत्रांतील योगदानाला सलाम करणारा हा सोहळा कर्तृत्व, प्रेरणा आणि अभिमानाचा खरा उत्सव ठरला.
महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स, आझाद फाउंडेशन आणि टाईम्स ऑफ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मा. मंगेशजी चिवटे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. त्यांनी आयोजक व सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
यावेळी येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक शामकांत शेडगे, भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान, प्राचार्य दत्तात्रय कोबरने, व्याख्याते किरण कोरे, माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दीपक राजे शिर्के, सह्याद्री हॉस्पिटलच्या संचालक डॉ. नेहा सिंग, तसेच रवींद्र कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमामागील भूमिका स्पष्ट करताना महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्सचे अध्यक्ष आदम सय्यद म्हणाले, “महाराष्ट्राच्या प्रगतीस हातभार लावणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना योग्य व्यासपीठ देणे, त्यांच्या कार्याचा गौरव करणे आणि समाजात प्रेरणादायी वातावरण निर्माण करणे हा या पुरस्कारामागील मुख्य हेतू आहे. ‘प्राईड ऑफ महाराष्ट्र’ हा केवळ पुरस्कार नसून, तो समाजासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा सन्मान आहे.”
या भव्य सोहळ्याला सह्याद्री हॉस्पिटल आणि गजलक्ष्मी ज्वेलर्स यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाच्या भव्यतेत अधिक भर पडली. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना यावेळी सन्मानित करण्यात आले.
हा सोहळा केवळ पुरस्कार वितरणापुरता मर्यादित न राहता, महाराष्ट्राच्या कर्तृत्व, प्रेरणा आणि सामाजिक बांधिलकीचा एकत्रित उत्सव ठरला. उपस्थित मान्यवरांनी पुरस्कारार्थींच्या कार्याचे कौतुक करताना, अशा उपक्रमांमुळे नवीन पिढीला प्रेरणा मिळते, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सतीश राठोड व स्नेहा कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले. अनिल घारे आणि साहिल शेख यांनी घेतलेल्या विशेष परिश्रमांमुळे हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला, असे आयोजकांनी सांगितले.




















