
मालेगावच्या डोंगराळे गावात 3 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; तळेगाव स्टेशन येथे नारी शक्ती मावळचा निर्धार मोर्चा
तळेगाव दाभाडे (स्टेशन): मालेगावच्या डोंगराळे गावात केवळ 3 वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त होत असताना, या घटनेविरोधात तळेगाव स्टेशन परिसरात महिलांनी प्रखर आवाज उठवला. सकल मराठा परिवार नारीशक्ती मावळ आणि स्री शक्ती मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने १९ नोव्हेंबर रोजी सत्यकमल कॉलनी परिसरात निर्धार मोर्चाचे आयोजन करण्यात आले. परिसरात महिलांचा टाहो आणि संतापाचा उद्रेक यामुळे वातावरण हंबरड्यांनी दुमदुमून गेले.


चिमुरडीवरील किळसवाण्या अत्याचाराची माहिती समोर आल्यानंतर समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात परिसरातील असंख्य महिला भगिनी, माता आणि युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. सकल मराठा परिवार नारीशक्ती मावळच्या सौ. दीपाली तांबे यांनी महिलांना एकत्रित आणून न्यायासाठी आवाज बुलंद करण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी संताप व्यक्त करत दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी जोरदारपणे मांडली.
मोर्चादरम्यान महिलांनी हातात फलक घेऊन “चिमुरड्यांच्या सुरक्षेसाठी एकत्र या”, “अत्याचारी नराधमांना फाशी द्या”, “नारीशक्ती जागी झाली तरच समाज सुरक्षित होईल” अशा घोषणा देत सरकारचे लक्ष वेधले. महिलांचा निर्धार स्पष्ट होता—“जोपर्यंत अशा विकृत नराधमांना कठोर शिक्षा दिली जात नाही, तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.”


मोर्चात सहभागी झालेल्या अनेक महिलांनी मुलींच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. समाजात वाढत्या अत्याचारांच्या घटनांना आळा बसण्यासाठी कठोर कायदे आणि त्वरित कारवाईची मागणीही करण्यात आली. पोलिस प्रशासनानेही या प्रकरणाचा काटेकोर तपास करून दोषींना तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी मोर्चातून जोरदारपणे करण्यात आली.


समाजातील प्रत्येक घटकाने अशा घटनांच्या विरोधात एकजुट दाखवण्याची गरज असल्याचे मत यावेळी उपस्थित महिलांनी व्यक्त केले. चिमुरडीसाठी न्याय आणि समाजातील सुरक्षिततेसाठी संघर्ष अटळ असल्याचा निर्धार यातून दृढ झाला.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















