
मावळात डान्स बारवर पोलिसांची धडक कारवाई .आमदार सुनिल शेळकेंच्या मुद्द्यानंतर प्रशासन कठोर. दोन आर्केस्ट्रा बारवर गुन्हे दाखल
वडगाव (मावळ) : नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मावळ तालुक्यातील डान्स बार तातडीने बंद करावेत, अशी ठाम मागणी आमदार सुनील शेळके यांनी उपस्थित केल्यानंतर वडगाव मावळ पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे–मुंबई महामार्गालगत सुरू असलेल्या ऑर्केस्ट्रा बारवर धडक कारवाई करण्यात आली असून दोन बारवर छापे टाकून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.



वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कान्हे फाटा व साते परिसरातील “गोल्डन ड्रीम ऑर्केस्ट्रा बार” आणि “विश्वदीप (फ्लेवर्स) ऑर्केस्ट्रा बार” येथे 12 डिसेंबर 2025 रोजी पोलिसांनी स्वतंत्र पथके तयार करून छापे टाकले. तपासादरम्यान शासनाने दिलेल्या परवाना अटी व शर्तींचा गंभीर भंग झाल्याचे निष्पन्न झाले.


कान्हे येथील गोल्डन ड्रीम ऑर्केस्ट्रा बारमध्ये रंगमंचावर केवळ आठ कलाकारांची परवानगी असताना तब्बल अकरा महिला कलाकारांना ठेवण्यात आले होते. कलाकारांकडे ओळखपत्रे नव्हती तसेच नियमांपेक्षा मोठा रंगमंच उभारण्यात आला होता. या प्रकरणी उदय चक्का सालियन (वय 49), दिनेश कृष्णा शेट्टी (वय 46) आणि किर्तन के. सी. टी. (वय 27) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


साते येथील विश्वदीप ऑर्केस्ट्रा बारमध्येही याच स्वरूपाचे नियमभंग आढळून आले. येथेही मर्यादेपेक्षा अधिक कलाकार, ओळखपत्रांचा अभाव आणि नियमबाह्य रंगमंच आढळल्याने प्रोप्रायटर व चालक मनिष सुवर्ण कुमार (वय 62) यांच्यावर कारवाई करण्यात आली.
दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींविरोधात महाराष्ट्र हॉटेल, उपहारगृहे व मद्यपानगृहे (बार रूम) मधील अश्लील नृत्यांवर प्रतिबंध व महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण अधिनियम 2016 अंतर्गत कलम 8 (1) नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्ये यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी माहिती दिली असून पुढील तपास ते स्वतः करीत आहेत.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















