वडगांव शहराती सार्वजनिक मंडळाने श्री पोटोबा देवस्थान संस्थान ट्रस्ट, जय बजरंग तालीम मंडळ ट्रस्ट तसेच वडगाव पोलीस स्टेशनला दिले निवेदन
वडगाव मावळ :
गावात अनेक वर्षांपासून चालत आलेल्या पारंपरिक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या क्रमांकात यंदा झालेल्या बदलामुळे वादाची स्थिती निर्माण झाली आहे. या संदर्भात श्री पोटोबा देवस्थान संस्थान ट्रस्ट आणि जय बजरंग तालीम मंडळ ट्रस्ट तसेच वडगाव पोलीस स्टेशन येथे अधिकृत निवेदन सादर केले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, दरवर्षी मानाच्या पहिल्या क्रमांकावर श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ व मोरया मित्र मंडळ ही दोन मंडळे सुरुवातीपासून सहभागी होत आहेत. मात्र यंदा दिनांक २ सप्टेंबर २०२५ रोजी विसर्जन मिरवणुकीत एका नवीन मंडळाचा रथ थेट पहिल्या क्रमांकात सामील करण्यात आला. यामुळे दीर्घकाळ चालत आलेल्या पारंपरिक क्रमात बदल झाला असून, जुन्या मंडळांत नाराजी पसरली आहे.
या बदलामुळे मिरवणुकीत उशीर झाला, तसेच काही मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये वादविवादाची परिस्थिती निर्माण झाली. गावातील मंडळांना विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात आल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे.
भविष्यात अशा वादांना आळा बसावा, परंपरेनुसार मानाचा क्रम कायम ठेवावा व कोणत्याही नवीन मंडळाला पहिल्या क्रमांकात स्थान देऊ नये, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.



















