वडगाव मावळमध्ये पान टपऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई; १६ खटले दाखल
वडगाव मावळ : वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीररित्या विक्री होणाऱ्या तंबाखूजन्य पदार्थांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी शुक्रवारी अचानक धडक कारवाई केली. वडगाव बाजारपेठ, वडगाव–लोणावळा रोड, वडगाव–तळेगाव चाकण रोड तसेच मुख्य बाजारपेठ परिसरातील पान टपऱ्यांवर ही तपासणी मोहीम राबविण्यात आली.
या कारवाईसाठी वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या अधिकारी व पोलिस अंमलदारांची पाच स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी बाजारपेठेत सुरू असलेल्या पान टपऱ्यांवर तपासणी करून बेकायदेशीररित्या विक्री होत असलेल्या गुंगीकारक पदार्थ, तंबाखूजन्य पदार्थ तसेच इतर तंबाखू उत्पादने यांची पडताळणी केली.
तपासणीदरम्यान पान मसाला व गुटखा विक्रीस प्रतिबंध अधिनियम २००३ च्या कलम ६(ब) व २४ अन्वये कारवाई करण्यात आली. या मोहिमेत एकूण १६ खटले दाखल करण्यात आले असून संबंधित पान टपरी चालक व मालकांना याबाबत कडक समज देण्यात आली आहे. संबंधित आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड, GR PSI जाधवराव, सहाय्यक फौजदार अजित ननवरे, आशिष काळे, पोलीस हवालदार सचिन गायकवाड, किरण नांगरे, नितीन गार्डी, श्रीशैल कंटोळी, उमाजी मुंडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल गोरे, प्रतीक केदारी, गणेश होळकर आणि किरण ढोले यांनी सहभाग घेत कारवाई केली.
पोलिसांनी सांगितले की, परिसरात बेकायदेशीर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री रोखण्यासाठी अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.



















