पक्षकारांवर ठराविक वकिलांचा दबाव.पोलिसांच्या वर्तणुकीवर खेड बार असोसिएशनचा संताप
चाकण: महाळुंगे, चाकण आणि आळंदी पोलिस ठाण्यांतील काही अधिकारी व कर्मचारी स्वतःच्या “ओळखीच्या” वकिलांचे नाव पक्षकारांना सांगून त्यांच्याकडे प्रकरणं द्यावी असा दबाव आणत असल्याचा गंभीर आरोप खेड बार असोसिएशनने केला आहे. पोलिसांकडून न्यायव्यवस्थेच्या क्षेत्रात हस्तक्षेप होत असल्याचा निषेध करत या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात असोसिएशनने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना निवेदन दिले आहे.


पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मोटार वाहन अपघात, महिलांवरील अत्याचार, जामिनाचे अर्ज, सत्र न्यायालयातील खटले अशा विविध प्रकरणांमध्ये ठराविक वकिलांचे नाव पोलिसांकडून आरोपी किंवा फिर्यादी पक्षाला सुचवले जात असल्याचे उघड झाले आहे. “हेच वकील ठेवा, तरच सहकार्य मिळेल”, “त्यांच्याकडे गेलात तरच तुमचं काम लवकर होईल अशा थेट धमक्या व प्रलोभनांचे आरोप संबंधित पोलिसांवर झाले आहेत.
यामुळे पक्षकार गोंधळून जात असून भीतीपोटी पोलिसांनी सुचवलेल्या वकिलांकडेच आपली प्रकरणे देत आहेत, असा आरोप असोसिएशनने केला आहे. यापूर्वीही असे प्रकार समोर आले असून, पोलिसांनी न्यायप्रक्रियेत नाक खुपसणे थांबवावे, अशी तुफान मागणी करण्यात आली आहे.


खेड बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. वैभव कर्वे यांनी सांगितले, “पक्षकारांना स्वतःचा वकील निवडण्याचा घटनात्मक हक्क आहे. पोलिसांनी ठराविक वकिलांचे नाव सांगणे ही गंभीर बाब आहे. अशा प्रकारचा दबाव कोणावरही आणू नये. जर पोलिसांकडून वकिलाची शिफारस केली जात असेल, तर संबंधितांनी तत्काळ पोलीस स्टेशन प्रमुख किंवा खेड बार असोसिएशनकडे तक्रार करावी.”

असोसिएशनने आयुक्त विनय कुमार चौबे यांना या संदर्भात कठोर चौकशी करून संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा वकिलांच्या संघटनेला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




