
बनेश्वर स्मशानभूमीतील अंधारावर नगरपरिषदेचे मौन.आठ दिव्यांपैकी फक्त दोनच चालू, सहा बंद, दोन दिवे गायब
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या कारभारातील निष्क्रियतेचा आणखी एक नमुना समोर आला आहे. गावातील बनेश्वर स्मशानभूमीत बसवलेला हायमास्ट दिवा हा प्रशासनाच्या बेफिकिरीचा प्रतीक बनला आहे. एकूण आठ दिव्यांपैकी केवळ दोनच दिवे सध्या सुरू आहेत, तर सहा दिवे बंद अवस्थेत असून त्यातील दोन दिवे तर पूर्णपणे गायब झाले आहेत. मृतांचे अंतिम संस्कार ज्या ठिकाणी होतात, तिथे अंधाराचे साम्राज्य पसरले आहे, आणि प्रशासन मात्र गाढ झोपेत आहे.


स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या स्मशानभूमीत हायमास्ट लावून प्रशासनाने मोठ्या खर्चातून व्यवस्था केली होती. सुरुवातीला काही दिवस हे दिवे सुरळीत चालू होते, पण गेल्या काही महिन्यांपासून दिव्यांची अवस्था बिकट झाली आहे. दिवे बंद पडले तरी कोणी तपासायला येत नाही, आणि तक्रारी केल्यावर “बघू” एवढाच सरकारी प्रतिसाद मिळतो.
अंधारामुळे रात्री अंतिमसंस्कारास येणाऱ्या नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागते. प्रकाश नसल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. काहीवेळा वीजपुरवठा सुरळीत असूनही दिवे सुरू होत नाहीत, म्हणजेच देखभालीचा पूर्ण अभाव स्पष्टपणे दिसून येतो. याच दरम्यान, दोन दिवे गायब झाल्याचेही स्थानिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. दिवे नेमके कोणी काढले, आणि त्यावर प्रशासनाने कोणती चौकशी केली, याबाबत नगर परिषद मौन बाळगत आहे.


नगरपरिषदेकडून या हायमास्टसाठी मोठा खर्च करण्यात आला होता. पण त्या पैशाचा उपयोग कितपत झाला, याचा हिशेब नागरिकांना हवा आहे. अशा ठिकाणी दिवे बंद राहणे म्हणजे मृतांच्या सन्मानावरच गदा आणणे, असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत. अनेकदा नगरपरिषद अधिकाऱ्यांना फोन आणि प्रत्यक्ष भेटी देऊनही काहीच फरक पडत नाही. अधिकारी “आम्ही बघतो” एवढे सांगून मोकळे होतात.


तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रशासनाने या विषयाकडे तात्काळ लक्ष देणे आवश्यक आहे. ‘स्मशानातील अंधार नगरपरिषदेच्या निष्क्रियतेचा पुरावा आहे,’ असे तीव्र शब्दांत स्थानिक नागरिकांनी सांगितले.
या प्रकरणावर नागरिकांचा एकच सवाल “हायमास्ट दिव्यांचा उपयोग जर फक्त कंत्राटदारांच्या बिलांसाठीच असेल, तर जनतेच्या पैशाचा अपव्यय थांबवावा!”
नगर परिषदेने तातडीने तपास करून बंद आणि गायब दिवे पुनर्स्थापित करावेत.अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलिप डोळस यांनी केली .
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११





