मामा-भाचे नि मावळच्या विकासासाठी एकत्र यावे — आम नागरिकाची इच्छा
तळेगावात सुनील शेळके–बाळा भेगडे एकाच मंचावर; ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ची झलक, मावळच्या राजकारणात नव्या समीकरणांची चाहूल
तळेगाव दाभाडे : राजकारणात कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे मावळचे आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे या ‘मामा-भाच्या’ जोडीने अखेर एकाच मंचावर येत ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ची झलक दाखवली. तळेगाव नगरपरिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनावेळी दोघेही उपस्थित राहिल्याने परिसरात चर्चा रंगली.


कार्यक्रमादरम्यान आमदार शेळके यांनी मावळच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व नेत्यांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. “आपल्या मतभेदांपेक्षा तालुक्याचा विकास महत्त्वाचा आहे. राजकारण ही मतांची नव्हे, तर मनांची लढाई असते. मावळच्या जनतेने दिलेला विश्वास एकत्रितपणे पेलूया,” असे आवाहन करताच उपस्थितांकडून जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला.
या आवाहनाला माजी मंत्री भेगडे यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. “राजकारणात मतभेद असतात, पण तालुक्याच्या विकासासाठी आपण सारे एकत्र आलो पाहिजे. मावळची माती आपली आहे, तिच्या प्रगतीसाठी आपण सर्वांचे हात एकत्र यायला हवेत,” असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याने उपस्थितांमध्ये आशावादाचे वातावरण निर्माण झाले.


गेल्या काही वर्षांत दोघांतील वैचारिक आणि राजकीय मतभेद सार्वजनिक झाले होते. मागील विधानसभा निवडणुकीत भेगडे यांनी भाजपचे नेते असूनही महायुतीच्या निर्णयाविरुद्ध जाऊन सुनील शेळके यांच्या विरोधात प्रचार केला होता. त्यामुळे त्यांच्या नात्यातील तणाव तीव्र झाला होता. मात्र, तळेगावच्या या कार्यक्रमात दिसलेल्या सलोख्याच्या वातावरणामुळे मावळच्या राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे.


राजकीय तज्ज्ञांच्या मते, मावळसारख्या जलदगतीने विकसित होणाऱ्या तालुक्यात पायाभूत सुविधा, औद्योगिक प्रगती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा विकास ही काळाची गरज आहे. त्यासाठी राजकीय एकता आवश्यक असल्याचे अनेक नागरिकांचे मत आहे. “विकासासाठी मतभेद विसरले गेले, हे जनतेसाठी शुभ संकेत आहेत,” असे तळेगावमधील ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले.
आम नागरिकांच्या दृष्टीनेही हे एक स्वागतार्ह पाऊल मानले जात आहे. “मामा-भाचे दोघेही मावळचे सुपुत्र आहेत. जर ते एकत्र आले, तर तालुक्याचा चेहरा बदलू शकतो. रस्ते, शिक्षण, उद्योग, आणि शेती या सर्व क्षेत्रांमध्ये बदलाची नवी पहाट उगवेल,” अशी भावना सोशल मीडियावर नागरिकांनी व्यक्त केली.

राजकीय विरोधकांमधील ही जवळीक फक्त एका कार्यक्रमापुरती मर्यादित राहते का, की याचा पुढे ठोस विकासात्मक उपक्रमांत परिणाम दिसेल, हे येणारा काळ ठरवेल. मात्र सध्या तरी मावळच्या जनतेच्या मनात एकच अपेक्षा स्पष्टपणे उमटत आहे –
“मामा-भाचे एकत्र या, आणि मावळच्या विकासासाठी हातात हात घाला.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०१ १




