गणेशोत्सवात शिवाजी शेलार मेमोरियल फाउंडेशनतर्फे १०१ गरजूंना अन्नदान
तळेगाव दाभाडे : गणेशोत्सव हा आनंद, भक्ती आणि ऐक्याचा सण मानला जातो. या सणाचे औचित्य साधून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी शिवाजी शेलार मेमोरियल फाउंडेशनतर्फे अन्नदानाचा उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमांतर्गत तळेगाव दाभाडे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील एकूण १०१ गरजूंना पोळी-भाजी, मसाले भात, गोड पदार्थ आणि मोदक प्रसाद वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधानाचे भाव दिसून आले.
या अन्नदान उपक्रमाचे नेतृत्व श्रीमती लिपिका अविनाश शेलार आणि श्रीमती मिनाक्षी शेलार यांनी केले. गेल्या दोन वर्षांपासून शिवाजी शेलार मेमोरियल फाउंडेशन शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संवर्धन या क्षेत्रांत समाजोपयोगी कार्य करत आहे.
याप्रसंगी बोलताना श्रीमती लिपिका शेलार म्हणाल्या,
“गणरायाची खरी सेवा म्हणजे समाजातील उपेक्षितांना आनंद देणे. त्यासाठीच हा अन्नदान उपक्रम हाती घेतला. पुढेही आम्ही असे विधायक उपक्रम सातत्याने राबवत राहू.”
तसेच संस्थेचे विश्वस्त अनिरुद्ध शेलार म्हणाले की,
“शिवाजी शेलार मेमोरियल फाउंडेशनतर्फे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यंदाच्या गणेशोत्सवात अन्नदानाबरोबरच शैक्षणिक मदत, आरोग्य तपासणी शिबिरे आणि वृक्षारोपण यांसारखे उपक्रमही होणार आहेत.”
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्या देशमुख, सुनिता निकम, पूनम जाधव, तन्वी शेवकर, लहू सोनवणे, संचित अरनाळे, संस्कार अरनाळे आणि अंशुल शेलार यांनी विशेष परिश्रम घेतले. सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे, ९९२१८०७०११




