मराठी पत्रकार संघ आयोजित ‘फिनिक्स’ विशेष सन्मान सोहळा
श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौरव
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उल्लेखनीय राजकीय व प्रशासकीय कार्याचा गौरव करण्यासाठी मराठी पत्रकार संघाच्या वतीने ‘फिनिक्स – विशेष सन्मान सोहळा’ मोठ्या दिमाखात आयोजित करण्यात आला आहे. हा भव्य सोहळा सोमवार, ८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजता नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडणार आहे.
मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात व प्रशासनात नवे पर्व उभे केले आहे. त्यांच्या उत्साहपूर्ण नेतृत्वगुणांची, पारदर्शक कामकाजाची आणि प्रामाणिकतेची दखल घेत संघाने हा विशेष सन्मान सोहळा आयोजित केला आहे.”
श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते विशेष सन्मान
या सोहळ्यात जगप्रसिद्ध अध्यात्मिक गुरू गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या शुभहस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेष सन्मान प्रदान केला जाणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला अध्यात्मिक आणि सांस्कृतिक अधिष्ठान लाभणार आहे.
‘फिनिक्स’ व्हिडिओ बुकचे प्रकाशन
याच प्रसंगी ‘फिनिक्स’ या प्रेरणादायी व्हिडिओ बुकचे प्रकाशनही होणार आहे. या विशेष व्हिडिओ बुकमधून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या राजकीय प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्पे, त्यांच्या निर्णयक्षमतेने उभे राहिलेले नवे उपक्रम आणि महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान याचे प्रभावी दर्शन घडवले जाईल.
मान्यवरांची उपस्थिती
सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय तसेच पत्रकारिता क्षेत्रातील अनेक मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहून मुख्यमंत्री फडणवीस यांना दिल्या जाणाऱ्या या सन्मानाचे साक्षीदार ठरणार आहेत. मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी होणाऱ्या या कार्यक्रमामुळे पत्रकारिता क्षेत्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात एक वेगळेच पर्व उलगडण्याची नोंद होणार आहे.
प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे (मो. ९९२१८०७०११)



















