राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक नारायण अभ्यंकर यांचे दुःखद निधन
तळेगाव दाभाडे (प्रतिनिधी):
येथील भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक नारायण उर्फ नंदकुमार दामोदर अभ्यंकर (वय ७०) यांचे मंगळवार, दि. ९ सप्टेंबर २०२५ रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
नारायण अभ्यंकर हे कलापिनी नाट्य संस्थेचे आजीव सदस्य होते. कलापिनी संस्थेच्या वास्तू उभारणीत त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. व्यावसायिक आयुष्यात त्यांनी अनेक वर्षे टाटा मोटर्स कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून काम पाहिले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी स्वतंत्र फॅब्रिकेशन व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाच्या माध्यमातून अनेक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत उद्योजकतेकडे वळविण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले.
अभ्यंकर यांचा शांत, मनमिळावू आणि सामाजिक स्वभावामुळे परिसरात मोठा मान-सन्मान होता. ते नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे संचालक व कलापिनी संस्थेचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर यांचे बंधू होत, तर युवा उद्योजक केदार अभ्यंकर यांचे ते वडील होत.
त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, भाऊ, भावजय, पुतणे, नातवंडे असा आप्त परिवार आहे.



















