कामशेत शहर पत्रकार संघात वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा; अशोक व मंगल भानुसघरे यांचा गौरव
कामशेत : समाजातील घडामोडींचा धागा जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य ज्यांच्या हातून अखंडपणे चालते, त्या वृत्तपत्र विक्रेत्यांचा गौरव करण्याचा सुंदर उपक्रम कामशेत शहर पत्रकार संघाच्या वतीने पार पडला. वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात तेजस न्यूज पेपर एजन्सीचे परिश्रमी पेपर विक्रेते अशोक भानुसघरे व मंगल भानुसघरे यांचा मानपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी बोलताना शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन वाघमारे म्हणाले, “वृत्तपत्र विक्रेत्यांच्या अखंड परिश्रमामुळे समाजात माहितीचा प्रवाह सातत्याने सुरू राहतो. प्रत्येक सकाळी वाचकांच्या दारी वेळेवर वृत्तपत्र पोहोचविण्याची जबाबदारी ते निःस्वार्थपणे पार पाडतात. त्यांच्या शिवाय माहितीचं चक्र थांबून जाईल.


वाघमारे यांनी पुढे सांगितले की, डिजिटल युगातही वृत्तपत्रांचे अस्तित्व कायम राहिले आहे, आणि याचे मोठे श्रेय या कर्मयोगींना जाते. पाऊस, ऊन, वारा असो वा थंडी सकाळी पहाटे चार वाजल्यापासून ते रस्त्यावर असतात. समाजातील प्रत्येक घटनेचा दुवा ते जनतेपर्यंत पोहोचवतात.


कार्यक्रमात उपाध्यक्ष सुभाष भोते यांनीही वृत्तपत्र विक्रेत्यांचा समाजजीवनातील सहभाग अधोरेखित केला. पत्रकार बातमी लिहितो, संपादक ती प्रसिद्ध करतो; पण ती बातमी लोकांपर्यंत पोहोचविण्याचं अंतिम दायित्व पेपर विक्रेत्यांवर असतं,” असं त्यांनी सांगितलं.
संघटक उत्तम ठाकर, शिवानंद कांबळे, प्रफुल्ल ओव्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवानंद कांबळे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रफुल्ल ओव्हाळ यांनी केले. आभार प्रदर्शन उत्तम ठाकर यांनी मानले.

या सत्कार प्रसंगी भानुसघरे कुटुंबीयानी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले, “गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही हा व्यवसाय करत आहोत. वाचकांचा विश्वास आणि प्रेम हेच आमचं खरं बक्षीस आहे.”
कार्यक्रमानंतर उपस्थितांनी एकमेकांना वृत्तपत्र विक्रेता दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पत्रकार संघाने पुढील काळात अशा सामाजिक जाणीवेच्या उपक्रमांना अधिक चालना देण्याचा निर्धार केला आहे.

वृत्तपत्र विक्रेता हा समाजातील माहिती प्रवाहाचा अदृश्य दुवा आहे. माहितीचा हा प्रवाह अखंड ठेवणाऱ्या या कर्मयोग्यांना वेळोवेळी सन्मान मिळावा, हीच अपेक्षा सर्वांच्या मनात व्यक्त झाली.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















