
वडगाव मावळ येथे श्रीमंत सरदार महादजी शिंदे विजय दिन सोहळ्याचे भव्य आयोजन
वडगाव मावळ : येथील श्रीमंत सरदार महादजी शिंदे विजय दिन सोहळा सोमवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने विविध धार्मिक, प्रबोधनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सकाळी १० वाजता तळेगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष संतोष हरिभाऊ दाभाडे यांच्या शुभहस्ते अभिषेक विधी पार पडणार आहे.


सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध व्याख्याते सचिन मधुराव ढोबळे यांचे ‘शिवशंभू चरित्र्य’ या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान होणार असून त्यानंतर रात्री ८ वाजता दीपोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या वेळी नवनिर्वाचित सर्व नगरसेवक व नगरसेविका उपस्थित राहणार आहेत.
या विजय दिन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार विक्रम देशमुख, वडगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे, माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे, मुख्याधिकारी प्रवीण निकम, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपनगराध्यक्ष सुनील ढोरे, मोडी लिपी अभ्यासक सचिन सरपाटील, सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन शेडगे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा अबोली मयूर ढोरे असणार आहेत.


या सोहळ्यात महादजी शिंदे क्रीडा पुरस्काराने रुचिका समीर ढोरे यांना तर महादजी शिंदे दुर्गवीर पुरस्काराने ‘सफर ३६१ किल्ल्याची’ सामाजिक प्रतिष्ठान यांना सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कार वितरणामुळे सामाजिक, क्रीडा व दुर्गसंवर्धन क्षेत्रातील कार्याला प्रोत्साहन मिळणार आहे.


हा संपूर्ण कार्यक्रम श्रीमंत सरदार महादजी शिंदे उद्यान, वडगाव मावळ येथे होणार असून कार्यक्रमाचे आयोजन रवींद्र नथुराम जाधव (संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र गिरी भ्रमण संस्था) व समस्त ग्रामस्थ मंडळी, वडगाव मावळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

महादजी शिंदे यांच्या पराक्रमाची आठवण जपत नव्या पिढीला इतिहासाची प्रेरणा देणारा हा विजय दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.




















