सह्याद्री नामा बातमीचा इफेक्ट बनेश्वर स्मशानभूमीतील कामे तातडीने पूर्ण
तळेगाव दाभाडे, : दि. १७ फेब्रुवारी रोजी ‘सह्याद्री नामा’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अंत्यविधीची दुरवस्था तळेगाव दाभाडेकरांची संतप्त हाक या वृत्ताची तात्काळ दखल घेत तळेगाव दाभाडे नगर परिषद प्रशासनाने बनेश्वर स्मशानभूमीतील प्रलंबित कामे युद्धपातळीवर पूर्ण केली आहेत. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गाव विभागातील बनेश्वर स्मशानभूमीत मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने अंत्यविधीच्या वेळी नातेवाईकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. देहाग्नी देण्यासाठीच्या लोखंडी जाळ्या नादुरुस्त होऊन काही ठिकाणी कोसळल्या होत्या. परिणामी अंत्यसंस्कार जमिनीवरच करावे लागत असल्याची गंभीर परिस्थिती उद्भवली होती.
वृत्त प्रसिद्ध होताच मुख्याधिकारी गिरिष दापकेकर यांनी तातडीने पाहणी करून संबंधित विभागाला कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. नादुरुस्त जाळ्यांच्या जागी नवीन जाळ्या बसविण्यात आल्या. गॅस शवदाहिनीची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. स्वच्छतागृहांची साफसफाई व दुरुस्ती चे काम हाती घेण्यात आले असून परिसर स्वच्छ करण्यात आला आहे
दशक्रिया विधीमंडपातील उर्वरित कामेही पूर्ण केली जात आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर स्मशानभूमीच्या विस्ताराबाबतही प्रशासन सकारात्मक असल्याची माहिती देण्यात आली.
वृत्तानंतर झालेल्या तातडीच्या कारवाईबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करत माध्यमांच्या पाठपुराव्याचे स्वागत केले आहे. मृतांच्या सन्मानासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची जबाबदारी असल्याची भावना व्यक्त होत आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११




















