आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार हमी योजना समितीची बैठक
मुंबई : प्रतिनिधी
विधान भवन येथे आज आमदार सुनील शेळके यांच्या अध्यक्षतेखाली रोजगार हमी योजना समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत नुकत्याच झालेल्या अकोला जिल्हा दौऱ्यात आढळलेल्या त्रुटी व अडचणींवर सविस्तर चर्चा करण्यात आली. रोजगार हमी योजनेंतर्गत अपूर्ण राहिलेली विविध विकासकामे, शेतकरी व ग्रामीण कामगारांना थेट लाभ न पोहोचल्याची प्रकरणे तसेच प्रशासकीय पातळीवरील अडथळ्यांचा समितीने गांभीर्याने घेतला.
अधिकाऱ्यांची साक्ष नोंदवली
समितीने या संदर्भात विभागीय सचिवांची साक्ष नोंदवून त्यांच्या जबाबदाऱ्या स्पष्टपणे विचारल्या. बैठकीस प्रधान सचिव (ग्रामविकास विभाग), अप्पर मुख्य सचिव (महसूल विभाग), उपजिल्हाधिकारी अकोला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश
बैठकीदरम्यान अपूर्ण राहिलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. अनेक कामे दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याचे निदर्शनास आल्यानंतर समितीने संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कामे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. यासोबतच या कामांचा पुनश्च आढावा पुढील बैठकीत घेण्यात येईल, असेही समितीने अधोरेखित केले.
आगामी बैठक छत्रपती संभाजीनगर येथे
यावेळी रोजगार हमी योजनेंतर्गत होणाऱ्या पुढील कामांचा प्रभावी आढावा घेण्यासाठी समितीची पुढील बैठक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी व सूचना देण्यात आल्या.
आमदार सुनील शेळके यांनी बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना सूचित करताना सांगितले की,
“रोजगार हमी योजना ही ग्रामीण भागातील शेतकरी, कामगार यांना आधार देणारी महत्त्वाची योजना आहे. कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण होणे आवश्यक असून याकडे दुर्लक्ष होणार नाही.”




















