खालिद का शिवाजी या चित्रपटावर बंदी घालण्याची शिव सेवक प्रतिष्ठानची मागणी . मावळ विभाग प्रमुख संतोष होजगे यांनी तहसीलदारांना दिले निवेदन
वडगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे विकृतीकरण करून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या खालिद का शिवाजी या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थान मावळच्या वतीने करण्यात आली आहे. प्रतिष्ठानच्यावतीने तहसीलदार विक्रम देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की खालिद का शिवाजी या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राविषयी अनेक खोटे आणि भ्रमक दावे करण्यात आले आहेत. छत्रपतींच्या सैन्यात ३५ टक्के मुस्लिम सैनिक होते हा दावा पूर्णपणे आधारहिन असुन शिवकालीन बखरी. पत्रव्यवहार तसेच डच आणि ब्रिटिश प्रवासवृत्तात अशा प्रकारची कोणतीही आकडेवारी दिलेली नाही.महाराजांचे ११ अंगरक्षक मुस्लिम होते” हा दावा देखील ऐतिहासिक नोंदींशी विसंगत असल्याचे निवेदनात स्पष्ट केले आहे.
शिवरायांचे अंगरक्षक हे कट्टर निष्ठावान, स्वराज्यासाठी जीव ओवाळून टाकणारे विश्वसनीय हिंदू योद्धे होते, असे संतोष होजगे यांनी नमूद केले आहे.रायगड किल्ल्यावर मस्जिद असल्याचा दावा देखील संपूर्णतः खोटा असल्याचे निवेदनात म्हटले आहे. रायगड हा हिंदवी स्वराज्याचा सिंहासनाधीश्वर गड असून, तेथे जिजाऊसाहेबांची समाधी, छत्रपतींचा दरबार, महादरवाजा आणि अन्य ऐतिहासिक वास्तू आहेत; मात्र रायगडावर मस्जिद आहे, असा कोणताही उल्लेख मूळ बखरीत, गडसंवर्धन खात्याच्या नोंदीत किंवा पुरातत्त्व विभागाच्या दस्तऐवजांत नाही, असेही त्यांनी नमूद केले
.त्यामुळे “खालिद का शिवाजी” या चित्रपटावर तातडीने बंदी घालावी, चित्रपटातील आशयाची सेंसर बोर्डमार्फत नव्याने तपासणी करावी, तसेच चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि लेखकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेवक प्रतिष्ठान हिंदुस्थानने केली आहे.
यासोबतच, भविष्यात अशा विकृत इतिहासावर आधारित कोणतेही माध्यम रोखण्यासाठी विशेष कायदा करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.
“छत्रपतींच्या इतिहासाशी छेडछाड आणि अपमान आम्ही कधीच सहन करणार नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करून समाजात तेढ पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कायद्याने थांबवले पाहिजे,” असे होजगे यांनी यावेळी स्पष्ट केले.
खालिद का शिवाजी या चित्रपटाविषयी मावळ तालुक्यात संतापाची लाट असून. अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हा चित्रपट मावळात प्रदर्शित करू दिला जाणार नाही. अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.दरम्यान, या चित्रपटातील दाव्यांमुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट पसरली असून, सोशल मीडियावर #BanKhalidKaShivaji हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. शिवप्रेमी संघटना आणि नागरिकांनी या चित्रपटाविरोधात एकमुखाने भूमिका घेतली असून, प्रशासन यावर कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी =गणेश नामदेव भेगडे. ९९२१८०७०११




















