गणेशमूर्ती विसर्जन प्रकरण : वडगाव नगरपंचायतीवर भाजपाचा तीव्र निषेध
वडगाव मावळ (प्रतिनिधी):
वडगाव नगरपंचायत हद्दीतील घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणेशमूर्तींचे विसर्जन नगरपंचायत प्रशासनाच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आले. काही मंडळांनी व नागरिकांनी मूर्ती नगरपंचायतीकडे दान केल्या होत्या, तर काहींनी नगरपंचायतीने उभारलेल्या कृत्रिम कुंडांमध्ये विसर्जन केले. प्रशासनाच्या अपेक्षेनुसार या मूर्तींचे योग्य प्रकारे विघटन होणे अपेक्षित होते.
मात्र विसर्जनानंतर अवघ्या पाच दिवसांतच या मूर्ती वडगाव-उर्से रोडलगतच्या मोकळ्या जागेत अस्ताव्यस्त टाकलेल्या अवस्थेत आढळून आल्या. यासंबंधीचे फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर नगरपंचायत प्रशासनाने यंत्राच्या सहाय्याने त्या मूर्तींचे सपाटीकरण केल्याचे समोर आले. यामुळे धार्मिक भावना दुखावल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून, मूर्तींचा असा अवमान झाल्याबद्दल वडगाव शहर भारतीय जनता पक्षाने प्रशासनाचा जाहीर निषेध केला आहे.
भाजपने निवेदनात म्हटले आहे की –
> “दान केलेल्या मूर्ती व कृत्रिम कुंडात विसर्जित केलेल्या मूर्ती नगरपंचायतीने जबाबदारीने व योग्य पद्धतीने विसर्जन न करता मोकळ्या जागेत फेकून दिल्या. हा प्रकार हिंदू धर्माचा अपमान असून हिंदू समाजाच्या भावना दुखावणारा आहे. सदर घटना अत्यंत वाईट व निंदनीय आहे.”
याबाबत नगरपंचायत प्रशासन, संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्यावर तातडीने कारवाई करावी, तसेच हा प्रकार जाणूनबुजून झाला आहे की कोणाच्या सांगण्यावरून, याची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजपने केली आहे.
तसेच मूर्ती टाकलेल्या जागेची मालकी कोणाची आहे, जागामालकाची संमती घेतली होती का, याचा तपास करून मालक दोषी असल्यास त्याच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
भाजपने स्पष्ट इशारा दिला आहे की –
> “या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी मुख्याधिकारी यांच्यावर असून, दोषींवर त्वरीत कारवाई झाली नाही तर भाजप वडगाव शहराच्या वतीने जनतेच्या मागणीनुसार तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
या संदर्भात भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे तसेच मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांना लेखी निवेदन सादर केले आहे.
याबाबतची माहिती वडगाव शहर भाजप अध्यक्ष संभाजी म्हाळसकर यांनी दिली.




















