नात्याला काळिमा: मेहुणीशी अनैतिक संबंधातून साडूनेच साडूचा खून
कोल्हापूर येथून आरोपीला अवघ्या तीन तासांत अटक
कामशेत (दि. 11, प्रतिनिधी): मेहुणीशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून साडूनेच साडूचा खून केल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यात उघडकीस आली आहे. ही घटना शुक्रवार (दि. 10) रात्री 11.30 ते शनिवारी (दि. 11) सकाळी 8 वाजेच्या सुमारास इंद्रायणी नदीवरील मुंढावरे पुलाजवळ घडली.

या घटनेत महेश मारुती अंभोरे (वय 35, रा. तुंगारली, लोणावळा) या तरुणाचा खून झाला असून, गुरुनाथ एकनाथ पाटील (वय 32, रा. गोल्ड व्हॅली, जैन मंदिर, लोणावळा) या त्याचाच साडूने खून केल्याचे समोर आले आहे.
पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महेश अंभोरे यांचे लग्न मे 2025 मध्ये झाले होते. आरोपी गुरुनाथ पाटील याचे, मयत महेश अंभोरे यांच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते. काही दिवसांपासून महेश यामुळे दोघांमध्ये वाद सुरू होता.

शुक्रवारी रात्री आरोपी गुरुनाथ पाटील याने साडू महेश अंभोरे यांच्या डोक्यात धारदार वस्तूने गंभीर जखम करून त्यांचा खून केला. त्यानंतर मृतदेह मुंढावरे (ता. मावळ) हद्दीत इंद्रायणी नदीच्या पुलाजवळ फेकून आरोपी फरार झाला.
घटनेची माहिती मिळताच कामशेत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तत्काळ तपास सुरू केला. आरोपी कोल्हापूरकडे पळाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी विशेष पथक रवाना केले.अवघ्या तीन तासांत कोल्हापूर येथून आरोपीला अटक करण्यात आली.

या कारवाईत लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोणपे, पोलीस निरीक्षक शंकर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पाटील, सुनील पवार, पोलीस उपनिरीक्षक बालाजी लोसरवार, दत्तात्रय शेडगे, समीर करे, अमोल तावरे, कैलास लबडे, गणेश तावरे, मंगेश मारकड, अमित पडाळे आणि रवींद्र राऊळ आदी अधिकारी आणि अंमलदार सहभागी होते.
आरोपीला रविवारी (दि. 12) रोजी वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास एलसीबी पुणे ग्रामीण, एलसीबी कोल्हापूर व पेठ वडगाव पोलिस स्टेशन मार्फत सुरू आहे.




















