प्रकाश ओसवाल यांचे गणेश मंडळांना आवाहन : “पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा”
तळेगाव दाभाडे : येथे जय बजरंग तरुण मंडळाच्या सहकार्याने रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे व जैन सोशल ग्रुपच्या वतीने भव्य मोफत आरोग्य तपासणी, रोगनिदान शिबिर, मोफत नेत्ररोग तपासणी व मोफत शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन करताना जैन इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष व माजी नगरसेवक प्रकाश ओसवाल यांनी गणेश मंडळांना आवाहन केले की, “गणेशोत्सव सामाजिक भान ठेवून तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला पाहिजे.”
या शिबिरामध्ये एकूण १४८ रुग्णांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. तसेच ४६ नागरिकांची हिमोग्लोबिन चाचणी करण्यात आली, तर ३३ नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश किसनराव भेगडे यांनी विशेष भेट दिली. जय बजरंग मंडळ सामाजिक भान ठेवून उपक्रम राबवत असल्याचे कौतुक करताना प्रकाश ओसवाल यांनी मंडळाचे अभिनंदन केले.
रोटरी क्लबच्या वतीने अध्यक्ष संतोष शांताराम परदेशी यांनी समाजोपयोगी उपक्रम सतत राबवण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत रामचंद्र ताये यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सौरभ मेहता यांनी मानले.
या शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी बसप्पा भंडारी, राकेश ओसवाल, विनोद राठोड, प्रदीप टेकवडे, प्रदीप मुंगसे, राकेश गरुड, मेधा शिंदे, सतीश राठोड, दीपक नळे, विशाल जव्हेरी व कुणाल जव्हेरी यांनी परिश्रम घेतले.
या वेळी डिस्ट्रिक्ट मेडिकल कमिटी चेअरमन डॉ. नेहा कुलकर्णी यांनी रोटरीच्या सामाजिक कार्याचा आढावा घेत शुभेच्छा दिल्या. तसेच जय बजरंग तरुण मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक सुरेशकाका जव्हेरी, जैन मंदिराचे विश्वस्त भवरमल संघवी, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष हितेश राठोड, डॉ. सौरभ मेहता, विनोद लोणारी, पंकज गुंदेशा आदी मान्यवर उपस्थित होते.
(प्रतिनिधी गणेश नामदेव भेगडे – ९९२१८०७०११ )






















