भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते, माजी उपसरपंच संतोष भिकोले यांचे दुःखद निधन
पवना नगर (ता. मावळ): मावळ तालुक्यातील आजिवली-जवण ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते संतोष भिकोले यांचे सोमवार, दि. ८ सप्टेंबर २०२५ रोजी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अकस्मात निधनाने मावळ तालुक्यातील राजकीय, सामाजिक व सर्वसामान्य जनतेमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
संतोष भिकोले हे सामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी नेहमीच धडपड करणारे कार्यकर्ते म्हणून परिचित होते. गावातील सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांमध्ये ते आघाडीवर राहून सक्रिय सहभाग घेत असत. राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी सर्वपक्षीय मैत्री व सहकार्याचे नाते निर्माण केले होते. त्यामुळे त्यांचा मोठा जनसंपर्क व लोकमान्यता निर्माण झाली होती.
माजी आमदार कै. दिगंबर भेगडे यांच्या प्रतिष्ठानमध्ये युवा कार्यकर्ता म्हणून त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी आपल्या कामाची वेगळी छाप पाडली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून त्यांचे नाव चर्चेत होते. त्यामुळे त्यांचे निधन हा पक्षासाठी तसेच तालुक्यातील राजकीय पटलासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करताना म्हटले की, “पवन मावळच्या राजकीय पटलावरील माझा जिवाभावाचा सहकारी हरपला आहे. संतोष हे कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळे स्थान निर्माण करून गेले होते.”
संतोष भिकोले यांच्या पश्चात पत्नी, बहिणी, चुलत भाऊ व इतर नातेवाईक असा मोठा परिवार आहे. सरपंच आशा भिकोले यांचे ते दिर होत.



















