
मरीमाता मंदिराच्या मागील भिंतीला टेकून दारू सेवन; अनधिकृत हातभट्टीमुळे भाविक व नागरिक त्रस्त
तळेगाव दाभाडे :घोरावाडी स्टेशन रोडलगत मरीमाता मंदिराच्या अगदी जवळ अवघ्या दहा फुटांवर—अनधिकृत हातभट्टी दारूचा उघडपणे चालणारा व्यवसाय आता स्थानिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. मंदिर परिसर हा श्रद्धा आणि शांततेचे प्रतीक असताना येथेच बेकायदेशीर दारूधंदा निर्भयपणे सुरू असल्याने भाविक, महिला आणि रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

सर्वात गंभीर बाब म्हणजे, या दारूधंद्याशी संबंधित काही लोक मंदिराच्या मागील भिंतीला टेकून उघडपणे दारू सेवन करत बसतात. मंदिराच्या पवित्रतेचा अनादर करणारे हे प्रकार स्थानिकांच्या भावना दुखावणारे ठरत आहेत. मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अशा असभ्य दृश्यांचा सामना करावा लागत असल्याने परिसराची पावित्रता आणि वातावरण दोन्ही बाधित झाले आहे.


रात्री उशिरापर्यंत येथे गर्दी जमा होत असून, आरडाओरडा, कचरा आणि अस्वस्थता यामुळे रहिवाशांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या भागातून जाणे असुरक्षित वाटत असल्याचेही समोर आले आहे. मुलांवरही याचा मानसिक परिणाम होत असल्याची पालकांची चिंता अधिक वाढत आहे.


स्थानिकांनी अनेकवेळा सामाजिक कार्यकर्त्यांकडे तक्रारी केल्या असूनही अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे. धार्मिक स्थळाच्या मागील भिंतीला उघडपणे दारू पिणारे दिसणे ही अत्यंत लाजिरवाणी आणि संतापजनक गोष्ट असल्याचे अनेकांनी स्पष्ट केले आहे.

रहिवाशांची मागणी आहे की प्रशासनाने तातडीने या हातभट्टी दारू धंद्यावर मोहीम राबवून परिसर स्वच्छ करावा आणि मंदिराची पवित्रता तसेच परिसराची सुरक्षितता पुन्हा प्रस्थापित करावी.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११



















