मावळ पर्यटन तालुका घोषित होणार – लोणावळ्यातील कुरवंडे येथे ३३३ कोटींचा टायगर पॉईंट प्रकल्प
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक – आमदार सुनील शेळके यांची माहिती
मुंबई : मावळ तालुक्यातील पर्यटनाला नवे रूप देणारा ३३३ कोटी रुपयांचा टायगर पॉईंट पर्यटन प्रकल्प लवकरच आकाराला येणार असून, या माध्यमातून मावळ तालुका “पर्यटन तालुका” म्हणून घोषित होणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत या प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला.
प्रकल्पाचे स्वरूप व सुविधा
या प्रकल्पासाठी ५ फेब्रुवारी २०२४ रोजीच शासनमान्यता मिळाली असून, लोणावळ्यातील कुरवंडे येथे हा भव्य प्रकल्प उभारला जाणार आहे. प्रकल्पात पर्यटकांसाठी खालील सुविधा उपलब्ध होणार आहेत
प्रवेशद्वार, टिकीट घर, फूड कोर्ट, स्नॅक बार, वाहनतळ
कनिष्ठ समारंभ हॉल, मनोरंजन उद्यान, सुरक्षाव्यवस्था
साहसी खेळांची रेलचेल : झिप लाईन, बंजी जंपिंग, वॉल क्लायम्बिंग, फेरीस व्हील
मनोरंजन सुविधा : झुला, रेन डान्स, स्केटिंग रिंक
आधुनिक सोयीसुविधा : पाण्याची टाकी, सीसीटीव्ही कॅमेरे, ध्वनीप्रणाली, प्रकाशयोजना
स्कायवॉक व दरमहा ध्वजवंदन सोहळा
पर्यटन व रोजगाराला चालना
बैठकीत अॅडव्हेंचर व अम्युझमेंट पार्क, टेंटिंग व निवास व्यवस्था उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे पर्यटकांना मुक्कामी थांबून पर्यटनाचा अधिक आनंद घेता येणार आहे.
प्रकल्पाच्या माध्यमातून हजारो स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. ग्रामीण भागातील तरुणाईला गाईडिंग, हॉटेल मॅनेजमेंट, फूड स्टॉल्स, ट्रॅव्हल सर्व्हिसेस यांसारख्या विविध क्षेत्रांत संधी मिळणार आहे.
बैठकीतील मान्यवर
या महत्त्वपूर्ण बैठकीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार सुनील शेळके, सुभाष शिरोळे, राजेश रासमुथ (नियोजन विभाग), रमेश जाणपुथकर (रामोजी फिल्म सिटी अध्यक्ष), डुंडे (निवासी अधिकारी – पुणे), योगेश मेस्त्री (मायुक्त – PMRDA), मंगेश वानखेडे (Guardian Media), गणेश आप्पा ढोरे, दीपक हुलावळे, साहेबराव करके, विठ्ठलराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार सुनील शेळके यांचे मत
“हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर लोणावळा व मावळ तालुक्याच्या पर्यटनाचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे. मावळ तालुका राज्यातील प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून उदयास येईल,” असा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला.
मावळ तालुक्याला पर्यटन तालुक्याचा दर्जा
बैठकीत प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मावळ तालुका अधिकृतपणे पर्यटन तालुका घोषित करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री महोदयांकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मावळच्या ग्रामीण भागाला समृद्धीची नवी दारे खुली होतील.



















