लाल मातीतला हिरा हरपला. नामवंत पैलवान व मावळ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत सातकर यांचे निधन
कान्हे : मावळ तालुक्याच्या सामाजिक, राजकीय आणि क्रीडा इतिहासात अमिट छाप सोडणारे ज्येष्ठ नेते, काँग्रेस (आय) पक्षाचे जाणते मार्गदर्शक आणि लाल मातीच्या आखाड्यातील दमदार पैलवान चंद्रकांत आप्पासाहेब सातकर यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी आज सोमवार दि. ११ ऑगस्ट २०२५रोजी दुपारी दुःखद निधन झाले.
चंद्रकांत सातकर हे मावळच्या राजकारणात अजातशत्रू म्हणून ओळखले जात. त्यांनी मावळ विधानसभा निवडणूक लढविली होती आणि काँग्रेस पक्षाच्या जिल्हास्तरीय नेतृत्वात आपली ठसा उमटविला. केवळ राजकारणातच नव्हे तर कुस्ती क्षेत्रातही त्यांचा दबदबा होता. स्वतः पैलवान असल्याने त्यांनी असंख्य तरुणांना आखाड्याकडे वळविले व अनेक स्पर्धांचे आयोजन करून ग्रामीण क्रीडा संस्कृती जिवंत ठेवली.
चंद्रकांत सातकर हे कुस्ती क्षेत्रात ऑल इंडिया कुस्ती चॅम्पियन. महाराष्ट्र चॅम्पियन. महाराष्ट्रात सहा वेळा सुवर्णा पदक विजेता . तर ऑल इंडिया कुस्तीमध्ये चार वेळा सुवर्णपदक विजेता अशी दमदार कुस्ती क्षेत्रात त्यांची कामगिरी राहिली आहे . प्रसिद्ध हॉटेल व्यवसायिक अजित सातकर यांचे चंद्रकांत सातकर हे वडील होत .अंत्यविधी मंगळवारी (१२ ऑगस्ट) सकाळी १० वाजता वैकुंठ स्मशानभूमी, खापरे ओढा, कान्हे (ता. मावळ) येथे पार पडणार असून, यावेळी अनेक मान्यवर, राजकीय कार्यकर्ते आणि क्रीडाप्रेमी उपस्थित राहणार आहेत.
त्यांच्या निधनाची बातमी समजताच मावळ तालुका, राजकीय क्षेत्र, क्रीडा जगत आणि सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली. अनेक नेते, कार्यकर्ते आणि क्रीडाप्रेमींनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.




















