विसर्जनानंतर गणेश मूर्तीचे छायाचित्रण, प्रकाशन व प्रसारणास बंदी
पुणे: गणेश विसर्जनानंतर कृत्रिम तलाव, हौद, नैसर्गिक तलाव, नदी, कॅनॉल यांसारख्या जलस्त्रोतामध्ये तरंगत्या किंवा अर्धवट तरंगत्या तसेच संकलित केलेल्या गणेश मूर्तींचे छायाचित्रण करणे, त्यांचे प्रकाशन किंवा समाजमाध्यमांवर प्रसारण करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. अशा छायाचित्रांमुळे धार्मिक भावना दुखावण्याची तसेच सार्वजनिक शांततेचा भंग होण्याची शक्यता असल्याने हा मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.
हा आदेश ४ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १ वाजल्यापासून ते १५ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये लागू राहील.
भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ नुसार हा आदेश पोलीस उपआयुक्त, विशेष शाखा व कार्यकारी दंडाधिकारी डाॅ. संदीप भाजीभाकरे यांनी काढला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अन्वये दंडनीय कारवाई करण्यात येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
डाॅ. भाजीभाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार हा आदेश सार्वजनिक ठिकाणी प्रसिध्द करण्यात येणार असून, स्थानिक वृत्तपत्रांमधूनही तो प्रसारित केला जाणार आहे.
प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे (मो. ९९२१८०७०११)



















