शिवशाही ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात शस्त्रपूजन सोहळा : पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांचे प्रतिपादन
लोणावळा – खंडे नवमीच्या पवित्र पर्वानिमित्त लोणावळ्यातील शिवशाही ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात प्राचीन शस्त्रांचे पूजन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. पुणे आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख व अनिल आगळे यांच्या शुभहस्ते या शस्त्रपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

या प्रसंगी बोलताना उपायुक्त पंकज देशमुख म्हणाले, “आपल्या राष्ट्राच्या शस्त्रसंस्कृतीत खंडे नवमीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी शस्त्रपूजन करणे म्हणजे राष्ट्राच्या सामर्थ्याचा आणि शौर्यपरंपरेचा सन्मान करण्यासारखे आहे. शिवशाही संग्रहालयाने केलेले हे ऐतिहासिक वस्तूंचे संकलन, जतन आणि संवर्धन ही अत्यंत आशावादी बाब असून, हा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. आपला इतिहास आणि परंपरा भावी पिढीने जपली पाहिजे.”
या सोहळ्यानिमित्त लोणावळा वैक्स म्युझियम आणि शिवशाही संग्रहालयातर्फे उपायुक्त पंकज देशमुख व अनिल आगळे यांचा राजेंद्र चौहान, धवल चौहान व सोमनाथ बोराडे यांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
शिवशाही ऐतिहासिक वस्तू संग्रहालयामध्ये सातवाहन काळापासून ब्रिटिशकालीन स्वातंत्र्य संग्रामापर्यंतच्या ५,००० हून अधिक वस्तूंचा समृद्ध ठेवा जतन करण्यात आला आहे. यात –
प्राचीन शस्त्रसंपदा, राजेशाही वस्त्रप्रकार, दुर्मीळ चित्रकला, ऐतिहासिक पत्रव्यवहार, जुनी नाणी, नाजूक हस्तकला अशा अनेक दुर्मीळ आणि ऐतिहासिक वस्तूंचा समावेश आहे.
डाॅ. प्रमोद सोमनाथ बोराडे व डाॅ. प्रिया प्रमोद बोराडे हे या संग्रहालयाचे जतन व संवर्धन करत असून, त्यांनी उपस्थितांना आवाहन केले की, “हा ऐतिहासिक वारसा प्रत्यक्ष पाहावा, इतिहास समजून घ्यावा आणि त्यातून भावी पिढीला प्रेरणा मिळावी.”
प्रतिनिधी गणेश नामदेव भेगडे. मो. ९९२१८०७०११




















