
संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने स्वातंत्र्याची जाणीव दृढ झाली .इतिहास अभ्यासक शुभम मोटे
तळेगाव दाभाडे : महाराष्ट्रासह संपूर्ण देशावर असलेल्या परकीय सत्तेला थेट आव्हान देत गुलामगिरीचे सावट दूर करण्याची प्रेरणा छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळे भारतीयांना मिळाली, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक शुभम नंदकुमार मोटे यांनी केले. शहरातील श्री शिवशंभू तीर्थकार्य समितीच्या वतीने आयोजित छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.


या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिन टेकवडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमंत उमाराजे दाभाडे, श्रीमंत याज्ञीसेनीराजे दाभाडे, श्रीमंत सत्यशीलराजे दाभाडे, नगराध्यक्ष संतोष दाभाडे पाटील, नगरसेवक शिवाजीराव आगळे, चिराग खांडगे, विनोद भेगडे, सागर बोडके उपस्थित होते. याशिवाय शिवशंभू स्मारक समितीचे अध्यक्ष संतोष भेगडे पाटील, कोषाध्यक्ष संजय बावीसकर, विजय काळोखे, पत्रकार गणेश भेगडे, रेश्मा फडतरे, जगन्नाथ काळे तसेच श्री शिवशंभू तीर्थ समितीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक पद्धतीने भगवा ध्वज पूजन, ध्वजारोहण व वंदनाने झाली. त्यानंतर श्री शिवशंभू यांच्या मूर्तीस विधिवत जलाभिषेक करण्यात आला. शिवशंभू वंदनेने संपूर्ण परिसर भारावून गेला. मान्यवरांच्या हस्ते शिवशंभू प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याच वेळी शिवशंभू तीर्थ समितीच्या दिनदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात आले.
इतिहास अभ्यासक शुभम मोटे यांनी आपल्या भाषणात छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, राष्ट्रनिष्ठा आणि बलिदान यांचा सखोल आढावा घेतला. संभाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे केवळ सत्तारोहण नव्हे, तर स्वराज्य, धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी घेतलेली ऐतिहासिक जबाबदारी होती. मुघलांसारख्या बलाढ्य परकीय सत्तेविरुद्ध त्यांनी दाखवलेले धैर्य आणि अखंड लढाऊ वृत्ती आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. असे ते म्हणाले. स्वाभिमान आणि स्वातंत्र्य यासाठी तडजोड न करण्याची शिकवण संभाजी महाराजांच्या जीवनातून मिळते, असेही त्यांनी नमूद केले.


अध्यक्षीय भाषणात सचिन टेकवडे यांनी तळेगाव स्टेशन व गावभागाला जोडणारे श्री शिवशंभू तीर्थ हे तळेगावच्या ऐतिहासिक वैभवात मोलाची भर घालणारे केंद्र ठरत असल्याचे सांगितले. हे तीर्थ केवळ धार्मिकच नव्हे, तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जाणीव जागवणारे स्थान आहे. भावी पिढीला इतिहासाची ओळख करून देण्याचे महत्त्वाचे कार्य येथून घडत आहे. असे त्यांनी मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक प्रणव विक्रम दाभाडे यांनी केले. सूत्रसंचालन कपिल देवडीगा यांनी केले, तर आभार प्रदर्शन हर्षद सांडभोर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री शिवशंभू तीर्थ समितीच्या सर्व सभासद व कार्यकारिणीने विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे शिवकालीन शस्त्रविद्येची प्रात्यक्षिके. तलवारबाजी, भाला, ढाल यांचे सादरीकरण पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या प्रात्यक्षिकांमुळे शिवकालीन पराक्रमाची सजीव अनुभूती उपस्थितांना मिळाली.
छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यामुळे तळेगाव दाभाडे शहरात ऐतिहासिक जागृती निर्माण झाली असून, स्वराज्याच्या मूल्यांचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यात हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११




















