
तळेगावात डीबी पथकाची मोठी कारवाई, ३९.८९ ग्रॅम एमडी सह तरुण अटकेत
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठी कारवाई करत ३९.८९ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) सदृश अंमली पदार्थासह एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई मा. वरिष्ठांच्या आदेशानुसार राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत करण्यात आली.



दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे तपास पथक, पीएसआय मोहरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टाफसह पेट्रोलिंग करत होते. यावेळी तळेगाव स्टेशन परिसरातील मनोहर नगर, इंद्रायणी कॉलनी येथील प्लॉट क्रमांक ६२, कृष्णराव भेगडे शाळेसमोर एक इसम रस्त्याच्या कडेला संशयास्पदरीत्या उभा असल्याचे आढळून आले. पोलीस पथक पाहताच त्याने संशयास्पद हालचाली केल्याने पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली.


झडतीदरम्यान आरोपीच्या ताब्यातील चारचाकी वाहनाची तपासणी केली असता त्यामधून एकूण ३९.८९ ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन सदृश अंमली पदार्थ मिळून आला. पंचांसमक्ष पंचनामा करून हा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


या प्रकरणी आरोपी ओम रविंद्र आभाळे (वय २२ वर्षे, रा. मनोहर नगर, तळेगाव दाभाडे, ता. मावळ, जि. पुणे) याला दिनांक १८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ६.३१ वाजता अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून अंदाजे ३,७२,३०० रुपये किमतीचा अंमली पदार्थ, २० लाख रुपये किमतीची एमजी हेक्टर (MH 14 JL 7214) कार, ७५ हजार रुपये किमतीचा आयफोन मोबाईल तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात NDPS Act कलम 8(c), 20(b), 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रविण कांबळे करीत आहेत.
अंमली पदार्थविरोधी मोहिमेत अशीच कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी सांगितले.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















