तळेगावात दुर्गामाता दौडचे उत्साहात आयोजन
तळेगाव दाभाडे : नवरात्री उत्सवानिमित्त विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने तळेगाव दाभाडे शहरात दुर्गामाता दौड चे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या उपक्रमाला शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभणार असल्याची माहिती परिषद व बजरंग दलाचे प्रशांत भेगडे यांनी दिली.
नवरात्री हा स्त्रीशक्तीच्या जागरणाचा सण असून, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पराक्रमामागे असलेल्या तुळजाभवानीच्या आशीर्वादाची परंपरा जोपासण्यासाठी दुर्गामाता दौड हा उपक्रम सुरू करण्यात आला. या माध्यमातून तरुण पिढीमध्ये देशभक्ती, धर्मभक्ती आणि राष्ट्रभक्तीचे संस्कार रुजवले जातात.
भेगडे म्हणाले की, “भारत मातेच्या रक्षणासाठी कटिबद्ध राहणारी, शिवशंभू रक्तगटाची पिढी घडावी व राष्ट्राच्या सांस्कृतिक स्वाभिमानाचे भान समाजात दृढ व्हावे, या हेतूने अनेक वर्षांपासून दुर्गामाता दौडचे आयोजन होत आहे.”
या वर्षाची दुर्गामाता दौड – वेळापत्रक
दौड सोमवार, २२ सप्टेंबर २०२५ पासून प्रारंभ होऊन गुरुवार, २ ऑक्टोबर २०२५ रोजी सांगता होईल. दरम्यान रोज सकाळी ६ वाजता ठराविक ठिकाणांवरून दौडला प्रारंभ होईल.
२२ सप्टेंबर: ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिर ते बनेश्वर शिवमंदिर
२३ सप्टेंबर: शेतकरी मित्र मंडळ ते धर्मवीर संभाजी तालीम मंडळ
२४ सप्टेंबर: धर्मवीर संभाजी मित्र मंडळ ते श्री लक्ष्मीनारायण मंदिर
२५ सप्टेंबर: लिटिल हार्ड सोसायटी ते स्वराज मित्र मंडळ
२६ सप्टेंबर: श्री वरसुबाई मंदिर ते श्री दत्त मंदिर
२७ सप्टेंबर: काळुबाई मंदिर (मोहर प्रतिमा) ते श्री विष्णू मंदिर (तेली आळी चौक)
२८ सप्टेंबर: सावली वृद्धाश्रम ते श्री गजानन महाराज मंदिर
२९ सप्टेंबर: श्री खंडोबा मंदिर ते श्रीराम मंदिर
३० सप्टेंबर: एंजल हिल्स सोसायटी ते श्री दत्त मंदिर (डाळ आळी)
१ ऑक्टोबर: श्री विठ्ठल मंदिर, मारुती मंदिर चौक ते चौराई मित्र मंडळ
विशेष कार्यक्रम
२ ऑक्टोबर, सायं. ८ वा. – विजयादशमी उत्सव, मारुती मंदिर चौक येथे शस्त्रपूजन व रावण दहन सोहळा.
२८ सप्टेंबर, सकाळी १० वा. – समस्त तळेगाव नगरीच्या कल्याणासाठी नवचंडी याग, स्थळ – श्री दत्त मंदिर, सुभाष चौक.
तळेगावात अनेक वर्षांपासून होणाऱ्या या धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमामुळे तरुणाईत जागर निर्माण होत असून, शहरातील नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी होतात. यंदाही दुर्गामाता दौड भव्यदिव्य आणि उत्साहात पार पडणार असून, सर्वांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने केले आहे.
(प्रतिनिधी – गणेश नामदेव भेगडे) ९९२१८०७०११



















