
धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज राज्याभिषेक उत्सव उत्साहात साजरा होणार २५ जानेवारी २०२६ रोजी तळेगाव दाभाडे येथील श्री शिवशंभु तीर्थ येथे भव्य आयोजन
तळेगाव दाभाडे : राष्ट्राच्या इतिहासात धर्म, स्वराज्य आणि स्वाभिमान यांचे अतूट नाते अधोरेखित करणारे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक उत्सव यंदा भक्तिभाव, ऐतिहासिक गौरव आणि राष्ट्रप्रेरणेतून साजरा केला जाणार आहे. माघ शुक्ल सप्तमी, रविवार दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ०९.३० ते ११.०० या वेळेत “श्री शिवशंभु तीर्थ”, छत्रपती श्री शिवशंभू स्मारक, तळेगाव दाभाडे येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.


“राष्ट्रांत धर्म जणू हां शरीरात प्राण” या भावनेचा प्रत्यय देणारा हा उत्सव छत्रपती संभाजी महाराजांच्या धर्मनिष्ठा, पराक्रम आणि त्यागाची आठवण करून देणारा ठरणार आहे. म्लेंच्छवधार्थ रणांगणात झुंज देत धर्मासाठी देहत्याग करणारे संभाजी महाराज आजही हिंदुहृदयांत ध्वजरूपाने विराजमान आहेत. त्यांच्या तेजस्वी चरित्रातूनच राष्ट्राला प्रेरणा मिळते, अशी भावना या कार्यक्रमामागे आहे.


कार्यक्रमाची सुरुवात भगव्या ध्वजाच्या पूजनाने होणार असून त्यानंतर जरीपटका भगव्या ध्वजाचे विधिवत वंदन व ध्वजारोहण करण्यात येईल. छत्रपती श्री शिवशंभु महाराजांच्या मूर्तीस जलाभिषेक करून शिववंदना व संबोधनाचा कार्यक्रम संपन्न होईल. या सर्व विधींमधून शिवशंभूंचे स्मरण हेच राष्ट्राचे उद्धरण असल्याचा संदेश देण्यात येणार आहे.


छत्रपती संभाजी महाराजांचे राज्याभिषेक म्हणजे केवळ ऐतिहासिक घटना नसून स्वराज्याची, धर्मरक्षणाची आणि राष्ट्रनिष्ठेची उज्ज्वल परंपरा आहे. आजच्या पिढीला इतिहासाची जाणीव करून देत त्यातून मूल्यसंस्कार रुजविण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले. शिवकालीन परंपरा, शौर्य आणि स्वाभिमान जपण्याचा संकल्प या निमित्ताने व्यक्त करण्यात येणार आहे.
या भव्य आणि प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन श्री शिवशंभु तीर्थ कार्यकारी समिती यांच्या वतीने करण्यात आले आहे. परिसरातील शिवभक्त, इतिहासप्रेमी नागरिक, युवक-युवती तसेच सर्व स्वराज्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करणारा हा उत्सव तळेगाव दाभाडे परिसरात ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण करणार असून “जय भवानी, हर हर महादेव” या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमणार, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.९९२१८०७०११




















