न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी माजी विद्यार्थी मेळावा सदस्य नोंदणी अभियानासह जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी

वडगाव मावळ, दि. १९ : येथील रयत शिक्षण संस्था संचालित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या वतीने शनिवार दि. २३ रोजी माजी विद्यार्थी मेळावा तसेच सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य सतीश हाके यांनी दिली.
विद्यालयाच्या प्रशस्त आवारात शनिवार दि. २३ रोजी सकाळी ८.३० वाजता हा मेळावा संपन्न होणार असून, शाळेत शिक्षण घेतलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित राहणाऱ्या माजी विद्यार्थ्यांची सदस्य नोंदणी करून त्यांना संस्थेच्या विविध उपक्रमांशी जोडण्यात येणार आहे.
विद्यालयाच्या शैक्षणिक विकासासाठी तसेच भविष्यातील नियोजनासाठी माजी विद्यार्थ्यांच्या सूचना, अनुभव आणि मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे प्राचार्य सतीश हाके यांनी सांगितले. ग्रामीण भागातील मराठी माध्यमाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी न्यू इंग्लिश स्कूलचा मावळ तालुका आणि पुणे जिल्ह्यात विशेष नावलौकिक असून, अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करत आहेत.
माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे विद्यालयाची प्रगती अधिक वेगाने होत असून, शाळेमध्ये विविध भौतिक सुविधा आणि शैक्षणिक उपक्रम वाढविण्यावर भर दिला जात आहे. जुन्या मित्रमैत्रिणींना भेटण्याची, शालेय आठवणींना उजाळा देण्याची आणि आपल्या शाळेच्या प्रगतीत योगदान देण्याची ही सुवर्णसंधी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“आपण शिकलो त्या शाळेच्या उत्कर्षासाठी प्रत्येक माजी विद्यार्थ्याचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा,” असे आवाहन प्राचार्य सतीश हाके यांनी केले आहे.






















