बेकायदेशीर पिस्तूल जवळ बाळगल्याप्रकरणी २३ वर्षीय तरुणाला अटक
शिरगाव पोलिसांची सोमाटणे फाट्याजवळ धडक कारवाई
सोमाटणे (ता. मावळ): परंदवडी रोड, सोमाटणे फाटा परिसरात शिरगाव पोलिसांनी मंगळवारी (१४ ऑक्टोबर) रात्री केलेल्या कारवाईत एका तरुणाला बेकायदेशीर पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जवळ बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. ही कारवाई श्री चौराई सिटी समोर करण्यात आली.

या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल गणेश सावंत यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव अजय गुलाब साळुंके (वय २३, रा. नेरे दत्तवाडी, ता. मुळशी) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय साळुंके याच्याकडे सुमारे ₹५२,००० किमतीचे लोखंडी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. तपासादरम्यान त्याच्याकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे उघड झाले. त्यामुळे पोलिसांनी त्याला त्वरित ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.

शिरगाव पोलिसांनी आरोपीकडून पिस्तूल आणि काडतुसे जप्त केली असून, ही शस्त्रे कोठून आणली आणि कोणत्या उद्देशाने वापरण्यात येणार होती याचा तपास सुरू आहे. पुढील चौकशी शिरगाव पोलीस ठाण्याचे पथक करत असून, अजय साळुंकेच्या संपर्कात आणखी कोणी व्यक्ती आहेत का, याचाही तपास सुरू आहे.

या कारवाईमुळे मावळ परिसरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर पोलिसांची नजर असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक नागरिकांनी शिरगाव पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.
प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे (मो. ९९२१८०७०११)



















