पिण्याच्या पाण्याच्या समस्येने टाकवे बुद्रुकमधील नागरिक हैराण
महिलांचा इशारा : “तक्रारींची दखल न घेतल्यास हंडा मोर्चा तहसील कार्यालयावर”

टाकवे बुद्रुक (ता. मावळ) येथे पिण्याच्या पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून माऊलीनगर आणि लक्ष्मीनगर भागातील नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः त्रास सहन करावा लागत आहे. वाढते नागरीकरण, अपुऱ्या योजना आणि ग्रामपंचायतीच्या निष्क्रिय कारभारामुळे नागरिकांच्या सहनशीलतेचा बांध फुटला आहे.

ग्रामपंचायतीकडून काही भागात पाईपलाइन टाकून पाणीपुरवठा सुरू केला असला तरी कामाचा वेग मंद असून अनेक ठिकाणी पाईपलाईन कापल्या गेल्या आहेत. काही ठिकाणी अनधिकृत नळ कनेक्शन घेतले गेले असून काही जण अनधिकृतपणे टॅंकरच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा करत आहेत. त्यामुळे सामान्य कुटुंबांना आणि विशेषतः महिलांना पाण्यासाठी मोठे हाल सहन करावे लागत आहेत.

महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयात तक्रारी दाखल करूनही त्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याची नाराजी व्यक्त केली आहे. “ग्रामपंचायतीने आमच्या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर आम्ही वडगाव मावळ पंचायत समिती कार्यालय आणि तहसील कार्यालयावर हंडा मोर्चा काढणार आहोत,” असा इशारा स्थानिक महिलांनी दिला आहे.

या गंभीर प्रश्नावर ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष घालून नियोजनबद्ध पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही
प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे, ९९२१८०७०११



















