
भीमाशंकर मंदिर तीन महिने बंद. जिल्हाधिकारी जिंतेद्र डुडी यांची माहिती
भीमाशंकर : राज्यातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण बांधकाम कामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर ९ जानेवारी २०२६ पासून पुढील तीन महिन्यांसाठी भाविकांच्या दर्शनासाठी तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान संस्थानने घेतला आहे. मात्र, महाशिवरात्रीचा कालावधी वगळण्यात आला असून त्या काळात मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.


राज्य शासनाने भीमाशंकर मंदिराच्या विशेष विकास आराखड्यास मंजुरी दिली असून, त्यानुसार सभामंडप, पायरी मार्ग, सुरक्षित प्रवेश-निर्गमन व्यवस्था तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांची अंमलबजावणी नियोजनबद्ध व ठरावीक कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी तसेच प्रत्यक्ष बांधकाम काळात संभाव्य धोके टाळण्यासाठी मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


यासंदर्भात २३ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासन, देवस्थान संस्थानचे विश्वस्त, स्थानिक दुकानदार व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झालेल्या संयुक्त बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. ९ जानेवारीपासून तीन महिने मंदिर बंद राहणार असून, १२ ते १८ फेब्रुवारी २०२६ या महाशिवरात्रीच्या कालावधीत भाविकांना दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


२०२७ मध्ये नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भविष्यात भीमाशंकर येथे भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुंभमेळ्यापूर्वी आवश्यक सुविधा व गर्दी नियंत्रणाची कामे पूर्ण करणे प्रशासनासाठी अत्यावश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी श्री भीमाशंकर यांची नित्य पूजा, अभिषेक व धार्मिक विधी परंपरेनुसार सुरू राहणार आहेत. मात्र या कालावधीत थेट दर्शन बंद राहील तसेच बांधकाम यंत्रणा, अधिकृत कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ वगळता कोणालाही मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.

भाविकांनी या निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासन व देवस्थान संस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















