मावळ तालुक्यात वारकरी भवन उभारण्याची दिंडी समाजाची मागणी
तळेगाव दाभाडे : मावळ तालुक्यात वारकरी परंपरेला चालना मिळावी, प्रवचनकार, कीर्तनकार आणि मृदुंगमणी घडावेत तसेच युवा पिढी संस्कारक्षम तयार व्हावी, या उद्देशाने स्वतंत्र वारकरी भवन उभारण्याची मागणी मावळ तालुका दिंडी समाजाने केली आहे. यासंदर्भात आमदार सुनील शेळके यांना दिंडी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन सादर केले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, “मावळ तालुक्यातील वारकरी परंपरा ही पांडुरंगभक्ती व संतवाङ्मयाची परंपरा जपणारी आहे. या परंपरेला भक्कम पाया मिळावा, भावी पिढ्यांमध्ये संस्कारांचे रोपण व्हावे याकरिता स्वतंत्र वारकरी भवनाची गरज आहे. तसेच आळंदी येथील धर्मशाळेतील जुन्या इमारतीला नूतनीकरणासाठी आर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा.”
निवेदन सादर करणारे मान्यवर
मावळ तालुका दिंडी समाजाचे अध्यक्ष महादू सातकर, सचिव नारायण ठाकर, खजिनदार सागर भसे, कार्याध्यक्ष अशोक राऊत, सल्लागार रोहिदास महाराज धनवे, तसेच राजाराम शिंदे, लक्ष्मण बालगुडे, प्रदीप हुलावळे, दत्तात्रेय पडवळ, बाबाजी महाराज काटकर, गणेश काजळे, सदाशिव विकारी, बाळासाहेब जांभुळकर, वसंत शिळवणे, बाळासाहेब सातकर, बबन शेवाळे, मधुकर गायकवाड, माऊली जांभुळकर यांनी प्रत्यक्ष आमदार सुनील शेळके यांची भेट घेऊन हे निवेदन दिले.
वारकरी परंपरेचे संवर्धन, तसेच समाजातील तरुणाईला योग्य दिशा मिळावी, यासाठी वारकरी भवन उभारण्याची मागणी तातडीची असल्याचे दिंडी समाजाने नमूद केले आहे.
(प्रतिनिधी – गणेश नामदेव भेगडे) ९९२१८०७०११



















