
सह्याद्री नामा न्यूज पोर्टलचा इफेक्ट : कामशेत बसथांब्यावरचे टायरचे अतिक्रमण हटवले
कामशेत: कामशेतमधील पवना चौक बसथांब्यावर गॅरेज मालकाकडून झालेल्या टायरचे अतिक्रमणाची दखल अखेर स्थानिक प्रशासनाने तातडीने घेतली. सह्याद्री नामा न्यूज पोर्टलने गुरुवार, दि. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रकाशित केलेल्या बातमीमुळे या प्रकरणावर प्रशासन हलकल्लोळ झाला असून, संबंधित गॅरेज मालकावर कारवाई करत बसथांब्यावरील संपूर्ण अतिक्रमण हटवण्यात आले आहे.



गेल्या काही महिन्यांपासून पवना चौकातील मुख्य बसथांब्यावरच स्थानिक गॅरेजवाल्याने शेडवर आणि आजूबाजूला मोठ्या प्रमाणात जुने टायर रचून ठेवले होते. या टायरच्या राशीमुळे विद्यार्थी व प्रवाशांना त्रास होत होता तसेच प्रवाशांना उभे राहण्याची जागाही कमी पडत होती. विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी विद्यार्थ्यांना आणि महिला प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. वाढत्या गर्दीत टायर घसरून पडण्याची, आग लागण्याची किंवा धक्काबुक्की होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात घालणारे हे अतिक्रमण काढून टाकण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत होती.


या संदर्भातील बातमी सह्याद्री नामा पोर्टलवर प्रसिद्ध होताच नागरिकांमध्ये मोठी चर्चा रंगली. बातमीचे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत संबंधित गॅरेजशी संवाद साधत तातडीने पथक पाठवले. त्यानंतर काही तासांतच बसथांब्यावरील सर्व टायर हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. बसथांबा मोकळा होताच प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.


अतिक्रमण हटविताना प्रशासनाने संबंधित गॅरेज मालकाला अशा प्रकारे सार्वजनिक मालमत्तेचा वापर केल्यास भविष्यात कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला.
बसथांबा पुन्हा प्रवाशांसाठी खुला आणि सुरक्षित झाल्याने नागरिकांनी सह्याद्री नामा न्यूज पोर्टलचे विशेष कौतुक केले. “प्रशासनापर्यंत आमचा आवाज पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम माध्यमांनी केले. वेळेवर व परिणामकारक बातमी दिल्याने आजचा धोका टळला,” अशा प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त करण्यात आल्या.
सह्याद्री नामाच्या बातमीमुळे केलेल्या या कारवाईमुळे बसस्थानक परिसर आता आणखीन स्वच्छ, शिस्तबद्ध आणि सुरक्षित झाला आहे. स्थानिकांचा रेंगाळलेला प्रश्न सुटल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















