कामशेत–कुसगाव रस्त्याच्या विकास कामाचा शुभारंभ २ कोटी रुपयांच्या निधीतून रस्त्याचे बांधकाम सुरू
कामशेत (ता. मावळ): कामशेत (खडकाळे) ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कामशेत ते कुसगाव या हद्दीपर्यंतच्या महत्त्वाच्या रस्त्याच्या विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला. पीएमआरडीए (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) मार्फत मंजूर झालेल्या २ कोटी रुपयांच्या निधीतून हे रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे.

या रस्त्याची लांबी सुमारे ७०० मीटर, रुंदी २० फूट आणि उंची ११ इंच इतकी असून, येत्या सहा महिन्यांत हे काम पूर्ण होणार आहे. हा रस्ता तयार झाल्यानंतर कुसगाव आणि इंद्रायणी कॉलनी परिसरातील नागरिकांना सुरक्षित, वेगवान आणि दर्जेदार प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.
मागील अनेक वर्षांपासून या रस्त्यावर मोठ्या खड्ड्यांमुळे आणि चिखलामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात या रस्त्याने प्रवास करणे धोक्याचे ठरत होते. त्यामुळे आता या नव्या रस्त्याचे बांधकाम सुरू झाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या रस्त्याच्या शुभारंभ प्रसंगी कामशेत ग्रामपंचायतीचे सरपंच रुपेश (बंटी) गायकवाड म्हणाले,
> “स्थानिक नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असलेला हा रस्ता अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होता. आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्यामुळे पीएमआरडीएने २ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, दर्जेदार बांधकाम करून हा रस्ता उभारला जाणार आहे. आता या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याने ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.”
रस्ता विकास कामाच्या शुभारंभ कार्यक्रमाला कामशेत ग्रामपंचायतीचे सरपंच रुपेश (बंटी) गायकवाड, उपसरपंच अंजनाताई विकेश मुथा, माजी सरपंच डॉ. विकेश मुथा, दत्ताभाऊ शिंदे, परेश बरदाडे, दत्ता रावते, संतोष काळे, मोहन वाघमारे, निलेश गायखे, सुधीर वीर यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी – गणेश नामदेव भेगडे (मो. ९९२१८०७०११)




















