
गणपती चौक–घोरावाडी स्टेशन परिसरात उंदीर-घुशींचा कहर; बंदिस्त गटारांची साफसफाई ठप्प, नागरिक त्रस्त
तळेगाव दाभाडे:गणपती चौक ते घोरावाडी स्टेशन या मुख्य मार्गावरील बंदिस्त गटारांची साफसफाई कोलमडल्याने परिसरात उंदीर-घुशींचा अक्षरशः सुळसुळाट झाला आहे. नगरपरिषदेच्या निष्क्रिय प्रशासनामुळे निर्माण झालेली ही परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत असून नागरिक प्रचंड त्रस्त झाले आहेत.


गटारांमधील कचरा हटवण्यासाठी आवश्यक असलेल्या यंत्रणेचा अभाव, वेळेवर देखभाल न होणे आणि तुटकी चेंबर बंद न केल्याने गटारांमध्ये कचऱ्याचा ढिग वाढत चालला आहे. परिणामी गटारातील पाणी साचून कुजकट दुर्गंधी पसरत आहे. या अस्वच्छ वातावरणाने उंदीर-घुशींचे प्रमाण झपाट्याने वाढले असून आता त्यांनी घरांचा ताबाच घेतल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.


स्थानिक रहिवाशांनी संताप व्यक्त करताना सांगितले की, “उंदीर घरांच्या पायाभरणीत मोठमोठे बिळे करीत आहेत. काही ठिकाणी तर भिंतींनाही खिंडार पडलं आहे. रचना कमकुवत होऊन घरांच्या सुरक्षिततेवर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.” रात्रीच्या वेळी उंदीर घरात घुसणे, कपाटे फोडणे, अन्नसामग्री कुरतडणे, तसेच विद्युत तारा चावून नुकसान करणे या घटनांनी रहिवाशांचे आयुष्य बेचैन झाले आहे.


काही बेशिस्त नागरिक तुटक्या झाकणांमधून थेट गटारात कचरा टाकत असल्याने परिस्थिती आणखी चिघळली आहे. गटारांमध्ये थरांवर थर जमा झालेल्या चिखल-कचऱ्यामुळे पाणी वाहून जाण्याचा मार्ग पूर्णपणे अडला आहे. यामुळे डास, कीटक, दुर्गंधी आणि संसर्गजन्य आजारांचा धोका वाढताना दिसत आहे.

नागरिकांची मागणी एकच नगरपरिषद तातडीने जागी व्हावी. संपूर्ण गटारव्यवस्थेची तत्काळ स्वच्छता मोहीम हाती घेऊन तुटकी चेंबर झाकणे बदलावी, तसेच कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. “आता तरी प्रशासनाने दुर्लक्ष केले तर हा उंदीर–घुशींचा कहर आरोग्य संकटात बदलायला वेळ लागणार नाही,” असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११























