गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा भव्य बक्षीस समारंभ उत्साहात संपन्न
सारिकाताई सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध मान्यवरांची मांदियाळी
इंदोरी (मावळ), दि. ८ (प्रतिनिधी)
मावळ तालुक्यातील सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांतून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केलेले युवा नेतृत्व प्रशांत दादा भागवत यांच्या पुढाकाराने आयोजित गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा भव्य बक्षीस वितरण समारंभ रविवारी (दि. ७ सप्टेंबर) जांभुळफाटा येथील शिवराज पॅलेस येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्याच दिवशी हा सोहळा झाल्यामुळे परिसरात आनंद व उत्साहाचे वातावरण होते. विशेष म्हणजे महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास आमदार सुनील शेळके यांच्या पत्नी व कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सौ. सारिका शेळके प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा सुवर्णाताई राऊत, ग्रामीण ब्लॉक अध्यक्षा वर्षा नवघणे, तालुक्यातील सरपंच-माजी सरपंच, महिला नेत्या व विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरजे अक्षय यांनी त्यांच्या विनोदी आणि उत्साही शैलीत केले. तर मुलं-मुलींच्या नृत्यसादरीकरणाने सभागृहातील वातावरण रंगतदार झाले.
आकर्षक बक्षिसांची लयलूट
गौरी-गणपती सजावट स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी हेलिकॉप्टर राईड, गोल्ड प्लेटेड गणेश मूर्ती, स्मार्टफोन, फ्रीज, वॉशिंग मशीन, पिठाची गिरणी, फूड प्रोसेसर, गॅस शेगडी, कुलर, मिक्सर, टेबल फॅन, इस्त्री अशी आकर्षक बक्षिसे देण्यात आली. यामुळे स्पर्धकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
विजेत्यांची यादी
१ ते २० क्रमांकापर्यंत विजेत्यांची नावे, गाव व मिळालेली बक्षिसे जाहीर करण्यात आली. उदा. विद्या काशिद (इंदोरी) – फ्रीज, अनिकेत शिंदे (राजपुरी) – पिठाची गिरणी, नंदा झोळ (वराळे) – वॉशिंग मशीन, हर्षदा/श्रद्धा/काजल उडापे (वधलवाडी) – स्मार्टफोन आदी.
तसेच दोन विशेष बक्षिसे देण्यात आली.
शैला अनुराग मराठे यांनी केलेल्या हेलिकॉप्टर राईड सजावटीसाठी त्यांना गोल्ड प्लेटेड गणेश मूर्ती देऊन गौरविण्यात आले.
प्रेरणा वाघ यांच्या सजावटीला सोशल मीडियावर सर्वाधिक प्रतिसाद मिळाल्याबद्दल त्यांना विशेष बक्षीस देण्यात आले. (त्यांच्या व्हिडिओला २५,५०० व्ह्यूज आणि १००० लाईक्स मिळाले.)
मान्यवरांचे मनोगत
सुवर्णाताई राऊत यांनी प्रशांत भागवत यांच्या कार्याचे कौतुक करताना, “ते आमदार सुनील शेळके यांच्या पावलावर पाऊल ठेवून जनतेची सेवा करीत आहेत,” असे म्हटले.
इंदोरी गावचे सरपंच शशिकांत शिंदे यांनीही प्रशांत भागवत यांचा राजकीय प्रवास उज्ज्वल होवो अशा शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी सारिकाताई शेळके यांनी महिलांसाठी राबविलेल्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करताना, “प्रशांत दादा यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवोत. आमदार सुनील आण्णांचा आशीर्वाद त्यांना सदैव लाभत राहील,” अशा शुभेच्छा दिल्या.
प्रशांत दादा भागवत यांचे मनोगत
आभार प्रदर्शन करताना प्रशांत भागवत म्हणाले,
“मावळचे जनसेवक आमदार सुनील शेळके हे माझ्यासाठी पांडुरंगासमान आहेत. त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेणे हेच माझे ध्येय आहे. आम्ही फक्त त्यांच्या पायाची वीट होण्याचे काम करीत आहोत. जनसेवेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम घडवणे हीच खरी सेवा आहे.”
सांगता
कार्यक्रमाची सांगता सुग्रास जेवणाने झाली. संपूर्ण तालुक्यातील महिला, मान्यवर, गावपातळीवरील प्रतिनिधी व स्पर्धकांच्या उपस्थितीत पार पडलेला हा कार्यक्रम प्रशांत दादा भागवत यांच्या सामाजिक व सां
स्कृतिक कार्याचा आणखी एक यशस्वी टप्पा ठरला.




















