

टाकवे बुद्रुकमध्ये ‘गजर कीर्तनाचा सोहळा – आनंदाचा’ भव्य भक्तिमय उत्सव; चार दिवस मावळ भक्तिरसात न्हाऊन निघाला
टाकवे बुद्रुक (मावळ) : कडजाई मातेच्या पावन उत्सवानिमित्त टाकवे बुद्रुक येथे १७ ते २० डिसेंबर दरम्यान झी टॉकीज प्रस्तुत ‘गजर कीर्तनाचा सोहळा – आनंदाचा’ या लोकप्रिय भक्तिमय कार्यक्रमाचे भव्य चित्रीकरण पार पडले. चार दिवस चाललेल्या या सोहळ्याने संपूर्ण मावळ परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. श्रद्धा, परंपरा, भक्ती आणि सामाजिक सलोखा यांचा सुरेख संगम साधणारा हा उपक्रम भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरला.


या काळात पहाटेपासून रात्रीपर्यंत अखंड हरिनाम गजर, कीर्तन, कथा आणि अभंगवाणीने परिसर दुमदुमून गेला. टाळ-मृदंगांच्या निनादात वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा अनुभवण्याची दुर्मीळ संधी अनेक दुर्गम भागांतील भाविकांना मिळाली. या कार्यक्रमामुळे वारीचा अनुभव प्रत्यक्ष न घेऊ शकणाऱ्या नागरिकांनाही भक्तीचा आनंद घेता आला.
दुपारी आयोजित संत चरित्र कथा या कार्यक्रमात ह.भ.प. तुकाराम महाराज मुंडे शास्त्री यांनी संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव महाराजांच्या विचारांचे रसाळ विवेचन केले. संतांच्या जीवनातील मूल्ये, समाजप्रबोधन आणि भक्तीचा मार्ग त्यांनी प्रभावीपणे उलगडून सांगितला. त्यांच्या ओघवत्या शैलीने श्रोते मंत्रमुग्ध झाले.


एकादशी व्रत कथेचे सादरीकरण ह.भ.प. सौ. संगीताबाई येनपुरे यांनी केले. एकादशीचे आध्यात्मिक महत्त्व, संयम, उपवास आणि नामस्मरणाचा संदेश त्यांनी साध्या पण प्रभावी शब्दांत मांडला. त्यांच्या कथाकथनामुळे वातावरण अधिक भक्तिमय झाले. यासोबतच विविध नामवंत कीर्तनकार व कथाकारांनी आपल्या सादरीकरणातून भक्तिभाव जागवून उपस्थितांना अंतर्मुख केले.


गभालेवाडी, माऊ, दवणे, डोंगरवाडी, कुसवली, नाणे, आंबळे, गोवित्री आदी अनेक गावांतून मोठ्या संख्येने वारकरी आणि भाविक उपस्थित होते. माजी सरपंच, ग्रामस्थ, महिला भगिनी तसेच युवकांनीही मोठ्या उत्साहाने या सोहळ्यात सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल उपस्थितांनी डॉ. अशोक दाते यांचे विशेष कौतुक केले. कोणताही राजकीय गाजावाजा न करता त्यांनी भक्ती, संस्कार आणि समाजसेवेचा आदर्श ठेवला. हा सोहळा केवळ कार्यक्रम न राहता समाजात एकोपा, सांस्कृतिक जाणीव आणि अध्यात्मिक ऊर्जा निर्माण करणारा ठरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















