तळेगावचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज पालखी छबिना मिरवणूक सोहळा उत्साहात
तळेगाव दाभाडे : विजयादशमी निमित्त तळेगाव दाभाडे येथील ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यांच्या पालखी छबिना मिरवणुकीचा सोहळा गुरुवारी (दि. २ ऑक्टोबर) सायंकाळी पारंपरिक वाद्यांच्या गजरात मोठ्या उत्साहात पार पडला. ग्रामप्रदक्षिणेदरम्यान नागरिकांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

दरवर्षीप्रमाणे यंदाही विजयादशमी निमित्त ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज व जोगेश्वरी मातेच्या पालखीत विराजमान मुखवट्यांची आरती विश्वस्त राजेश पिराजी सरोदे व उत्सव समिती अध्यक्ष अविष्कार अशोक (अंकल) भेगडे यांच्या हस्ते करण्यात आली. आरतीनंतर पालखी सीमोल्लंघनासाठी निघाली.
पालखी मिरवणुकीदरम्यान नगारा, संभाळ, शिंगाड, शंख, डमरू, टाळ-मृदुंग यांच्या गजरात भजनी मंडळे, महिला भगिनी, पालखी मानकरी, भोई समाज बांधव, भराडी, गोंधळी, डोळसनाथ महाराज ट्रस्ट, उत्सव समिती, तालीम मंडळ व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले. “ज्ञानोबा-तुकाराम” च्या जयघोषात संपूर्ण गाव भक्तीमय झाले होते.
सीमोल्लंघनानंतर पालखी ग्रामप्रदक्षिणा करून पुन्हा मंदिरात दाखल झाली. यावेळी कै. शंकर कुंभार परिवाराच्या वतीने तळ्याकाठी पालखीचे स्वागत करण्यात आले. पालखी सोबत नगारे, घोडे, विद्युत रोषणाईने सजवलेल्या छत्र्या, ऐतिहासिक वेशभूषेत तलवारी घेऊन उभे वीर, दानपट्टाधारक गोंधळी व भराडी उपस्थित होते. गावातील ठिकठिकाणी औक्षण करून व रंगीबेरंगी रांगोळ्यांनी ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले.
दसऱ्यापूर्वीच श्री डोळसनाथ महाराज मंदिरात आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शारदीय नवरात्र उत्सवात नऊ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. यामध्ये सप्तशती पाठ, भोंडला, कुमारिका पूजन, हळदी-कुंकू, देवीचा जोगवा, स्त्रीसूक्त पठण, स्तोत्र पठण, दीप प्रज्वलन, कालभैरवाष्टक आरती आणि नवचंडी याग यांचा समावेश होता. या कार्यक्रमांना महिलांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
आरतीनंतर शारदीय नवरात्रोत्सव आणि छबिना पालखी सोहळ्याची सांगता झाली. हा उत्सव म्हणजे भक्ती, उत्साह आणि ग्रामएकतेचे प्रतीक ठरला. गावकऱ्यांनी मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावाने सहभाग घेतल्याने श्री डोळसनाथ महाराजांच्या पालखी मिरवणुकीचे सोहळा सर्वांच्या मनात कायमस्वरूपी कोरला गेला.
प्रतिनिधी : गणेश नामदेव भेगडे, मो. ९९२१८०७०११



















