तळेगावात सहाव्या मजल्यावरून पडून ३४ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे शहरातील स्टेशन परिसरात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. द रियानो वेलन्सिया सोसायटीमध्ये राहणाऱ्या रेवती स्वप्नील ठकरे (वय ३४ वर्षे) या महिलेचा सहाव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला.
ही घटना गुरुवार दिनांक ४ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ११:३० वाजता घडली. रेवती ठकरे आपल्या कुटुंबासह मनोहर नगर येथील विद्याविहार कॉलनीतील द रियानो वेलन्सिया सोसायटीमध्ये राहत होत्या. रोजच्या घरगुती कामात त्या नेहमीप्रमाणे कपडे वाळत घालण्यासाठी गॅलरीत गेल्या. त्या स्टुलावर उभे राहून कपडे वाळत घालत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि त्या सहाव्या मजल्यावरून खाली कोसळल्या.
या भीषण पडल्याने रेवती ठकरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तत्काळ त्यांना नागरिकांच्या मदतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, तळेगाव दाभाडे येथे नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज चौधरी यांनी तपासल्यानंतर उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
या दुर्दैवी घटनेमुळे सोसायटी परिसरात आणि तळेगाव दाभाडे शहरात शोककळा पसरली आहे. तरुण वयात एका गृहिणीचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार ननवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून या अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.
(प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे) ९९२१८०७०११



















