
तळेगाव दाभाडेत श्री अलंकापुरी पंचक्रोशी पायी प्रदक्षिणेचे जल्लोषात स्वागत; वारकर्यांचा उत्साह ओसंडून वाहिला
तळेगाव दाभाडे : श्रद्धा, भक्ती आणि परंपरेचा संगम असलेल्या श्री अलंकापुरी पंचक्रोशी पायी प्रदक्षिणा सोहळ्याचे तळेगाव दाभाडे येथे सोमवारी (दि. ८ डिसेंबर २०२५) उत्साहात स्वागत करण्यात आले. श्री विठ्ठल मंदिर संस्था, तळेगाव दाभाडे आणि स्वराज्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गाव तळ्याजवळ सकाळी ११ वाजता या पालखी सोहळ्याचे औपचारिक स्वागत झाले. सौ. नूतनताई संतोष भेगडे यांच्या हस्ते पूजन व स्वागत करण्यात आले, तर या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी वारकरी बांधवांचे जल्लोषात स्वागत केले.


स्वागतानंतर पालखी मार्गक्रमण करत खडक मोहल्ला – भोई आळी – बाजारपेठ – राजेंद्र चौक – तेली समाज मंदिर – सुभाष चौक – शाळा चौक या पारंपरिक मार्गाने पुढे जात श्री विठ्ठल–रुक्मिणी मंदिरात विसावली. येथे येणाऱ्या सर्व वारकरी बांधवांसाठी महाप्रसादाची सुंदर व्यवस्था करण्यात आली होती. जरी या ठिकाणी पालखीचा मुक्काम नव्हता, तरी अल्प विश्रांतीनंतर पालखीने दुपारी ३ वाजता पुढील प्रवासाला प्रस्थान केले.


यंदा अलंकापुरी पंचक्रोशी पायी प्रदक्षिणेचे ७२९ वे वर्ष पूर्ण होत असून हा सोहळा इतिहास, अध्यात्म आणि भक्ती यांचा अनोखा वारसा जपणारा मानला जातो.



प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११























