तळेगाव दाभाडेमध्ये इच्छुक उमेदवारांनी मतदारांशी घेतल्या गाठीभेटी.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विविध भेटवस्तूंचा वर्षाव; आगामी निवडणुकीचा रंग चढू लागला#
तळेगाव दाभाडे :तळेगाव दाभाडे मधे येऊ घातलेल्या स्थानिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय तापमान चढू लागले आहे. शहरातील अनेक प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी गेल्या आठवड्याभरात मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या असून, दिवाळीच्या निमित्ताने मतदारांना विविध भेटवस्तू देत आपले जनसंपर्क मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.


दिवाळी हा सण आनंदाचा, पण याच काळात राजकीय इच्छुकांसाठी हा “संपर्क अभियानाचा” काळ ठरतो. यंदाही तसेच दृश्य तळेगावमध्ये दिसून आले. काहींनी घराघरात भेट देत आशीर्वाद मागितला, तर काहींनी समाजमंडळांच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवत मतदारांना आपली भूमिका स्पष्टपणे सांगितली. विविध प्रभागांमध्ये उमेदवारांच्या कार्यकर्त्यांची लगबग दिवसभर सुरू असून, संध्याकाळी गल्लीबोळांत भेटवस्तूंच्या पिशव्या आणि दिवाळी फराळाचे पाकिटे पोहोचवताना दिसतात.
स्थानिक नागरिकांनुसार, या वर्षी भेटवस्तूंमध्ये थोडा वैविध्य आले आहे. काही इच्छुकांनी फराळाचे डबे वाटले आहेत. तर काहीनी अगरबत्ती.उटणे.दिवे.रांगोळी.का ही ठिकाणी छोटेखानी दिवाळी स्नेहसंमेलनाचे आयोजन करून मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला.एका इच्छुक नगरसेवकाने तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून या सांस्कृतिक कार्यक्रमात महिला भगिनींसाठी विविध स्पर्धा होणार असून विजेत्या महिला भगिनींना हेलिकॉप्टरने सफर घडविण्याचे नियोजन देखील केले आहे तसेच काही इच्छुकांनी आपल्या प्रभागातील महिला भगिनींसाठी विविध ठिकाणी देवदर्शन सहलीचे आयोजन केलेले पाहायला मिळत आहे.


काही माजी नगरसेवकांनी पुन्हा उमेदवारीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे, तर तरुण इच्छुक नव्या जोमाने मैदानात उतरले आहेत. सोशल मीडियावरही प्रचाराचे सूर लागले असून, फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप गटांतून संदेश, शुभेच्छा आणि प्रचार व्हिडिओंचा वर्षाव सुरू आहे. तळेगावातील सर्व प्रभागात इच्छुक उमेदवारांनी मोठ्या मोठ्या आकाराचे बॅनर देखील लावलेले पाहायला मिळत आहे.
दरम्यान, काही नागरिकांनी या भेटवस्तूंच्या राजकारणावर नाराजीही व्यक्त केली आहे. “दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा देणं समजण्यासारखं आहे, पण मतदारांना वस्तू देऊन प्रभाव पाडण्याचा प्रयत्न योग्य नाही,” अशी प्रतिक्रिया काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली. त्यांनी निवडणूक आयोगाने अशा हालचालींवर लक्ष ठेवावे, अशी मागणी केली


एकंदरीत, तळेगाव दाभाडे परिसरात राजकीय हालचालींना गती मिळाली असून, दिवाळीच्या उत्साहात राजकारणाची धग जाणवू लागली आहे. पुढील काही दिवसांत कोणा कोणाला उमेदवारी जाहीर होते आणि मतदारांची पसंती कोणाकडे झुकते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११







