तळेगाव स्टेशन परिसरातील खड्डे न बुजवल्यास ५ ऑक्टोबरला आंदोलन
सामाजिक कार्यकर्त्यांचा सार्वजनिक बांधकाम विभागाला अल्टिमेटम
तळेगाव दाभाडे : तळेगाव स्टेशन परिसरातील सेवाधाम हॉस्पिटल समोरील मोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. या खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत असून, नागरिकांनी आता तीव्र भूमिका घेतली आहे. ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता स्टेशन परिसरातील मराठा क्रांती चौकात आंदोलन छेडण्याचा निर्धार नागरिकांनी केला आहे.
या खड्ड्यांमुळे आजवर अनेक अपघात झाले असून काहींचे जीवही गेले आहेत. तरीदेखील संबंधित विभाग “बेशुद्धासारखा बसलेला” असल्याची तीव्र नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
हे आंदोलन सामाजिक कार्यकर्ते मिलिंद अच्युत, दिलीप डोळस, कल्पेश भगत, सुनील उर्फ मुन्ना मोरे व प्राध्यापक नितीन फाकटकर यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेलद्वारे निवेदन पाठवण्यात आले आहे.
स्थानिक नागरिकांनी याआधीही अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र विभागाने त्याकडे कोणतीही गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबण्याचा निर्णय घेतला आहे.
“सार्वजनिक बांधकाम विभागाने ५ ऑक्टोबरपूर्वी खड्ड्यांची दुरुस्ती केली नाही, तर मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून आंदोलन करू,” असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
या पार्श्वभूमीवर ५ ऑक्टोबरला होणाऱ्या आंदोलनामुळे स्टेशन परिसरातील वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता असून प्रशासनाची कसोटी लागणार आहे.
(प्रतिनिधी – गणेश नामदेव भेगडे)९९२१८०७०११



















