
पाणी समस्या सोडवण्याची ताकद ग्रामस्थांतच — पानी फाउंडेशनच्या फार्मर कप प्रशिक्षणाला तळेगावात उत्स्फूर्त प्रतिसाद
तळेगाव दाभाडे : पाणी हा केवळ नैसर्गिक स्रोत नसून भवितव्य घडवणारी सामूहिक जबाबदारी आहे, असा ठाम संदेश गुरुवारी (दि. ४) तळेगाव दाभाडे येथे झालेल्या पानी फाउंडेशनच्या ‘फार्मर कप’ शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमातून देण्यात आला. राज्य शासनाचा कृषी विभाग, आत्मा पुणे आणि आमिर खान–किरण राव यांच्या पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत (एनएपीएचटी) या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. मावळ तालुक्यातील सर्व मंडल कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी तसेच तालुक्यातील तब्बल १२० प्रगतिशील शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत तालुका कृषी अधिकारी मारुती साळे यांनी जलसंधारणाच्या बदलत्या गरजा आणि सामुदायिक सहभागाचे महत्त्व स्पष्ट केले. एनएपीएचटीचे संचालक मिलिंद आकरे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी संताजी जाधव, तसेच पानी फाउंडेशनचे उपविभागीय समन्वयक प्रतीक गुरव, मानसी बर्गे आणि प्रशिक्षक कोमल देशमुख हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.


पानी फाउंडेशनचे प्रतीक गुरव आणि मानसी बर्गे यांनी फार्मर कप स्पर्धेची रूपरेषा, पानी फाउंडेशनचा प्रवास, ‘टीमवर्क’ची संकल्पना, शेतकरी निवड प्रक्रिया आणि गट प्रशिक्षणाविषयी सविस्तर माहिती दिली. “पाण्याची समस्या सरकार सोडवून देईल, अशी अपेक्षा न ठेवता गावकरी, अधिकारी आणि प्रशिक्षण घेतलेले स्वयंसेवक यांनी एकत्र येत जलसंधारणाचे काम हाती घेतले तर प्रत्येक गाव पाण्याबाबत आत्मनिर्भर होऊ शकते,” असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले.


शेतकऱ्यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत मोठ्या प्रमाणावर गट तयार करून यावर्षीच्या फार्मर कप स्पर्धेत सक्रिय सहभाग नोंदवण्याचा निर्धार व्यक्त केला. जलसंधारणाच्या तांत्रिक पद्धती, श्रमदानाचे महत्त्व, शाश्वत शेती आणि दीर्घकालीन पाणी नियोजन या मुद्द्यांवरील मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला.
यावेळी आत्मा पुणेचे प्रकल्प संचालक सुरज मडके आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी आपल्या मार्गदर्शनातून ग्रामीण समाजाने पाणी व्यवस्थापनात घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्माचे बीटीएम राहुल घोगरे यांनी केले, तर यशस्वी नियोजनासाठी शीतल गिरी, अभिषेक महानोर आणि विवेक एकलंबे यांनी सहकार्य केले.


तळेगाव दाभाडे येथे पार पडलेला हा प्रशिक्षण कार्यक्रम शेतकऱ्यांना पाणी संवर्धनाचे सामर्थ्य पुन्हा जाणवून देणारा ठरला. सामूहिक प्रयत्न, योग्य नियोजन आणि सातत्य या त्रिसूत्रीवर ग्रामपातळीवरील पाणी प्रश्न सुटू शकतो, असा ठळक संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११























