
भटके श्वान संगोपनाबाबत तळेगाव दाभाडे येथे मार्गदर्शन कार्यशाळा : अपक्ष उमेदवार किशोर भेगडे यांचा उपक्रम
तळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार किशोर छबुराव भेगडे यांच्या पुढाकाराने भटके श्वानांच्या संगोपनाविषयी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा २८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता मंत्रा सिटीच्या मागे असलेल्या ‘ला फिटनेस’ जिमजवळ पार पडणार आहे.


शहरामध्ये वाढत्या भटक्या प्राण्यांची संख्या, त्यांच्या सुरक्षिततेसह नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न, तसेच प्राणीसंवर्धनासंबंधी योग्य जाणिवा समाजात पोहोचाव्यात या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. भटके श्वान हे शहरी परिसंस्थेचा एक महत्त्वाचा भाग असून, त्यांचे योग्य संगोपन, लसीकरण, अन्नाची व्यवस्था, तसेच त्यांच्याशी कसे वागावे याविषयी तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन दिले जाणार आहे.


किशोर भेगडे यांनी सांगितले की, “भटके श्वान हे शहराचे अविभाज्य घटक आहेत. त्यांच्याविषयी संवेदनशीलता निर्माण झाली तरच मनुष्य आणि प्राणी यांच्यातील समन्वय अधिक चांगला साधता येईल. या कार्यशाळेमुळे नागरिकांना योग्य माहिती मिळेल आणि शहरातील प्राणीसंवर्धनाच्या उपक्रमांना गती मिळेल.”


या कार्यक्रमात पशुवैद्यकीय तज्ज्ञ, प्राणीसंवर्धन संस्था, स्वयंसेवक आणि स्थानिक नागरिक सहभागी होणार आहेत. श्वानांचे वर्तन, त्यांची काळजी घेताना पाळावयाच्या प्राथमिक उपाययोजना, तसेच भटक्या प्राण्यांमुळे उद्भवणाऱ्या समस्या कमी करण्याचे मार्ग यावर विशेष चर्चा करण्यात येणार आहे.

कार्यक्रमासाठी परिसरातील सर्व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, अधिकाधिक लोकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
प्रतिनिधी=गणेश नामदेव भेगडे.मो९९२१८०७०११




















