भीमाशंकर येथे ‘फ्रेंड्स ऑफ नेचर’ संस्थेची रानभाज्यांची सहल
तळेगाव दाभाडे : शहरातील पर्यावरणप्रेमी संस्था फ्रेंड्स ऑफ नेचर यांच्या वतीने रविवार दि. १४ सप्टेंबर रोजी श्री क्षेत्र भीमाशंकरजवळील खरपुड गावात रानभाज्यांची सहल आयोजित करण्यात आली होती. या सहलीत मोठ्या संख्येने महिला व पुरुष नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
रानभाज्यांचे मानवी आहारात अनन्यसाधारण महत्व असून पावसाळ्यात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या भाज्यांच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते. या भाज्यांची ओळख नव्या पिढीला करून देणे, रानभाज्यांविषयी जनजागृती करणे तसेच आदिवासी भागातील महिलांना आर्थिक सहाय्य मिळवून देणे व शहरी-ग्रामीण महिलांमध्ये नाळ जोडण्याचा प्रयत्न करणे हा या सहलीमागचा प्रमुख उद्देश असल्याचे संस्थेचे महेश महाजन यांनी सांगितले.
सहलीदरम्यान विविध प्रकारच्या रानभाज्या पाहण्याचा व चाखण्याचा अनुभव सर्वांना घेता आला. तसेच आदिवासी भागातील नैसर्गिकरीत्या आढळणाऱ्या औषधी वनस्पतींबाबत माहिती देण्यात आली. संस्था मागील सहा-सात वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबवत आहे.
रानभाज्यांचे महत्व स्पष्ट करताना विश्वास देशपांडे म्हणाले,
“जुन्या लोकांच्या आहारात नैसर्गिक पद्धतीने उगवलेल्या रानभाज्यांचा समावेश असल्यामुळे ते निरोगी आयुष्य जगले. आज मात्र बाजारात मिळणाऱ्या भाज्या व फळे केमिकलयुक्त असल्याने अनेक आजार उद्भवत आहेत. त्यामुळे अशा रानभाज्यांची योग्य ओळख करून त्यांचा आहारात समावेश होणे गरजेचे आहे.”
या उपक्रमात तळेगाव दाभाडे, निगडी, कोथरूड, पुणे आदी भागांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सहलीचे नियोजन डॉ. गणेश सोरडे, महेश महाजन, सुधाकर मोरे, ज्ञानेश्वर लष्करी, विश्वास देशपांडे, अमोल गोरे, गणेश भोसले, महेश पाठक तसेच महिला प्रतिनिधी सौ. देशपांडे व सौ. लष्करी यांनी केले.
(प्रतिनिधी गणेश नामदेव भेगडे) ९९२१८०७०११



















