मावळ पंचायत समिती आरक्षण सोडत १३ ऑक्टोबर
प्रांताधिकारी सुरेंद्र नवले यांच्या अध्यक्षतेखाली प्रक्रिया पार पडणार
वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील आगामी पंचायत समिती निवडणुकांसाठी आरक्षण सोडत प्रक्रिया येत्या १३ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता पार पडणार आहे. ही सोडत प्रक्रिया भेगडे लॉन्स, वडगाव मावळ येथे आयोजित करण्यात आली असून, ती मा. सुरेंद्र नवले (प्रांताधिकारी, मावळ विभाग) यांच्या देखरेखीखाली व मा. विक्रम देशमुख (तहसीलदार, मावळ) यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे.

या सोडतीत मावळ तालुक्यातील पंचायत समिती सदस्य पदांसाठी विविध प्रवर्गांनुसार (सर्वसाधारण, मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती-जमाती तसेच महिला आरक्षण) आरक्षण निश्चित केले जाणार आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर मावळ तालुक्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून, विविध पक्षांच्या इच्छुक उमेदवारांकडून पुढील निवडणूक रणनिती आखली जाण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

सोडत कार्यक्रमासाठी संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी तसेच नागरिक उपस्थित राहणार आहेत. पारदर्शक व संगणकीकृत पद्धतीने आरक्षण प्रक्रिया होणार असल्याची माहिती तहसील प्रशासनाकडून देण्यात आली आहे.



















